62 वर्षीय पुणेकर आजोबांनी विस्तारा एअरलाइन्सच्या हवाई सुंदरीची काढली छेड
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 17:02 IST2018-03-28T17:02:43+5:302018-03-28T17:02:43+5:30
विस्तारा एअरलाइन्सच्या विमानात एका हवाई सुंदरीशी छेडछाडीचा प्रकार समोर आला आहे. महिला क्रू मेंबर्सनं इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलिसांत या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

62 वर्षीय पुणेकर आजोबांनी विस्तारा एअरलाइन्सच्या हवाई सुंदरीची काढली छेड
नवी दिल्ली- विस्तारा एअरलाइन्सच्या विमानात एका हवाई सुंदरीशी छेडछाडीचा प्रकार समोर आला आहे. महिला क्रू मेंबर्सनं इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलिसांत या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. 24 मार्च रोजी एअर विस्तारा कंपनीचे विमान लखनऊहून दिल्लीला जात असताना आरोपी प्रवाशानं या हवाई सुंदरीला वाईट हेतूनं स्पर्श केला. या प्रकरणात हवाई सुंदरीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली.
विशेष म्हणजे या हवाई सुंदरीची कोण्या तरुणानं नव्हे, तर 62 वर्षीय पुणेकर आजोबांनी छेड काढली असून, हे आजोबा पेशानं व्यावसायिक आहेत. विमान जमिनीवर उतरल्यानंतर या आजोबांनी हवाई सुंदरीची छेड काढली, या आरोपाखाली 62 वर्षीय आजोबांना अटक करण्यात आली.
या प्रकारानंतर विस्तारा एअरलाइन्सनं एक बैठकही घेतली असून, या पुणेकर आजोबांना नो फ्लाय लिस्टमध्ये टाकण्यात आलं आहे. विस्तारा एअरलाइन्सच्या कर्मचा-यांशी चुकीचं वर्तणूक करणाऱ्या प्रवाशांवर 30 दिवसांसाठी विमान प्रवासाची बंदी घालण्यात येत असल्याची माहिती विस्तारा एअरलाइन्सनं दिली आहे.