पाकिस्तानचे ६०० एसएसजी कमांडो भारतीय हद्दीत घुसण्याच्या तयारीत; जम्मूच्या माजी डीजीपींचा खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 12:05 IST2024-07-29T12:05:09+5:302024-07-29T12:05:26+5:30
जम्मू भागात नुकत्याच झालेल्या हल्ल्यांमागे पाकिस्तानच्या सर्वोच्च लष्करी कमांडरचा हात असल्याचे वृत्त आहे. - वेद

पाकिस्तानचे ६०० एसएसजी कमांडो भारतीय हद्दीत घुसण्याच्या तयारीत; जम्मूच्या माजी डीजीपींचा खळबळजनक दावा
जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैन्यावरील दहशतवादी हल्ल्यांमध्ये अचानक वाढ झाली असून आपले अनेक जवान शहीद झाले आहेत. यामागे पाकिस्तानी एसएसजी कमांडोंचा हात असल्याचा खळबळजनक दावा जम्मू काश्मीरचे माजी डीजीपी शेशपाल वेद यांनी केला आहे. पाकिस्तानी कमांडो भारतीय हद्दीत घुसण्याच्या तयारीत असून काही कमांडो घुसखोरी करण्यात यशस्वी ठरल्याचाही दावा त्यांनी केला आहे.
जम्मू भागात नुकत्याच झालेल्या हल्ल्यांमागे पाकिस्तानच्या सर्वोच्च लष्करी कमांडरचा हात असल्याचे वृत्त आहे. हे युद्धाचे कृत्य आहे आणि भारताने त्यानुसार प्रत्युत्तर देणे आवश्यक आहे, असे ट्विट करत वेद यांनी व्हिडीओ जारी केला आहे. पाकिस्तानी लष्कराचे एसएसजी कमांडो मोठ्या संख्येने सीमेपलीकडे सज्ज असल्याचे सूत्रांनी सांगितल्याचे ते म्हणाले.
या कमांडोंची संख्या ६०० च्या आसपास असून त्यापैकी काही जण भारतात घुसखोरी करण्यात यशस्वी झाले आहेत. आता उर्वरितांना भारतात पाठविण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. हा खूप मोठा काळ असणार आहे आणि आपल्याला कशासाठीही तयार रहावे लागेल, असा इशारा वेद यांनी दिला आहे.
त्यांनी स्थानिक स्लीपर आणि जिहादी सेल सक्रिय केले आहेत. विशेष कमांडोच्या दोन बटालियन भारतीय हद्दीत प्रवेश करण्यासाठी पाकिस्तानी सीमेवर वाट पाहत आहेत. हे युद्धाचे कृत्य आहे आणि भारताने त्यानुसार प्रतिसाद देणे आवश्यक आहे, असे वेद म्हणाले. वेद हे 2016 ते 2018 या काळात जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे डीजीपी होते.