मुंबई: एअर इंडियाने मंगळवारी विविध कारणांमुळे तसेच ताफ्यातील विमानांत असलेल्या संभाव्य दोषांच्या तपासणीचा वाढता भार लक्षात घेत लंडन - अमृतसर, दिल्ली - दुबई अशा सहा ड्रीमलाइनर विमानांसह एकूण सात विमानांची उड्डाणे दिवसभरात रद्द केली. अहमदाबाद अपघातानंतर एअर इंडियाने आतापर्यंत ड्रीमलाइनरची ६६ उड्डाणे रद्द केली आहेत, हे उल्लेखनीय.
दिवसभरात रद्द करण्यात आलेल्या उड्डाणांमध्ये बंगळुरू-लंडन, दिल्ली-व्हिएन्ना, दिल्ली-पारस आणि मुंबई-सन फ्रान्सिस्को या विमानांचाही समावेश आहे. दरम्यान, सकाळी विमान उपलब्ध नसल्याने एअर इंडियाने अहमदाबाद-लंडन हे नियोजित उड्डाण रद्द केले होते. नागरी उड्डयण महासंचालकांच्या आदेशानुसार एअर इंडियाच्या सर्वच विमानांची देशभर तपासणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर काही उड्डाणे रद्द करावी लागली आहेत.
१२ जून रोजी झालेल्या अपघातात २४२ जणांचा मृत्यू झाला होता. हे बोईंगचे ड्रीमलाइनर ७८७-८ विमान होते. या पार्श्वभूमीवर देशभर सर्वच अशा ड्रीमलाइनर विमानांची तांत्रिकदृष्ट्या कसून तपासणी केली जात असून यामुळे काही उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. ब्रिटन आणि युरोपातील इतर देशांसाठी एअर इंडियाच्या ताफ्यात बोईंगची ड्रीमलाइनर हीच विमाने आहेत.
नागपुरात इमर्जन्सी लँडिंगकेरळमधील कोच्ची विमानतळावरून राजधानी दिल्लीकडे निघालेल्या इंडिगो एअर लाइनच्या एका विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली. त्यानंतर या विमानाचे नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर मंगळवारी इमर्जन्सी लैंडिग करण्यात आले. हे विमान ओमानच्या मस्कत शहरातून कोच्ची आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले होते.
कोलकाता: इंजिनमध्ये निर्माणझालेल्या तांत्रिक बिघाडामुळे एअर इंडियाचे सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईला जाणारे विमान कोलकात्यातच थांबवण्यात आले. हे विमान पुढे जाणार नसल्याचे जाहीर केल्यावर विमानतळावर गोंधळ उडाला. २११ प्रवाशांना लवकरात लवकर मुंबईत पोहोचविण्यासाठी अधिकाऱ्यांची धावपळ करावी लागली.