कार अन् जीपची जोरदार धडक; आजोबा नातवंडांसह एकाच कुटुंबातील ५ मृत्यू तर ८ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 08:25 IST2025-02-04T08:25:18+5:302025-02-04T08:25:54+5:30
जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील काहींना पुढील उपचारासाठी जोधपूरला नेण्यात आले आहे.

कार अन् जीपची जोरदार धडक; आजोबा नातवंडांसह एकाच कुटुंबातील ५ मृत्यू तर ८ जखमी
जयपूर - राजस्थानच्या बालोतरा इथं भीषण अपघात झाला असून यात एका कारने जीपला धडक दिली आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाला आहे तर ८ जण जखमी आहेत. घटनेची माहिती मिळताच तात्काळ स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवले.
पोलिसांच्या माहितीनुसार, हा अपघात हायवेवरील पायला गावाजवळ झाला. या दुर्घटनेतील पीडित डॉक्टरांकडे जाऊन तिथून काही घरगुती सामान घेऊन घरी परतत होते. कारसमोरून येणाऱ्या जीपची आणि कारची धडक झाली. ज्यात एकाच कुटुंबातील ५ लोक दगावले तर इतर ८ जखमी झाले. पोलिसांनी अपघातग्रस्त दोन्ही वाहने जप्त केली आहेत. हा अपघात कसा घडला याची चौकशी सुरू आहे. या दुर्घटनेत ६० वर्षीय शिवलाल सोनी, त्यांचा २८ वर्षीय मुलगा श्रवण सोनी, ४ वर्षीय मंदीप सोनी, ६ महिन्याची रिंकु सोनी, २५ वर्षीय ब्यूटी सोनी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
जखमींची प्रकृती चिंताजनक
या अपघातातील जखमींची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील काहींना पुढील उपचारासाठी जोधपूरला नेण्यात आले आहे. जखमींमध्ये अरुण कुमार, त्यांचा ५ वर्षीय मुलगा अभिनंदन गंभीर आहेत.
दरम्यान, जीपमधून प्रवास करणारे मोमताराम लकवाग्रस्त होते, त्यांना अहमदाबादला उपचारासाठी नेले होते. तिथून ते राजस्थानमधील त्यांच्या गावी परतत होते. यावेळी मेगा हायवेवरून त्यांच्या घराच्या ५ किमी अलीकडेच हा अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र पोलीस तपास सुरू आहे. मृतदेहांचे पोस्टमोर्टम करून त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.