५ किलो LPG सिलिंडर विक्रीने ओलांडला १३ लाखांचा टप्पा, सरकारने पुरवठा वाढवला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 23:41 IST2026-04-12T23:39:03+5:302026-04-12T23:41:06+5:30
PNG विस्तारालाही गती मिळाली.

५ किलो LPG सिलिंडर विक्रीने ओलांडला १३ लाखांचा टप्पा, सरकारने पुरवठा वाढवला
अमेरिका आणि इराणमधील तणावामुळे भारतातील गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कमी उत्पन्न गट आणि स्थलांतरित कामगारांना दिलासा देण्यासाठी ५ किलो LPG सिलेंडरचा पुरवठा वाढवण्यात आला असून, पाइप गॅस (PNG) कनेक्शनचा विस्तारही वेगाने करण्यात येत आहे.
५ किलो LPG सिलेंडरची विक्री वाढली
अधिकृत माहितीनुसार, २३ मार्चपासून आतापर्यंत ५ किलोच्या १३ लाखांहून अधिक LPG सिलेंडरची विक्री झाली आहे दररोज १ लाखांपेक्षा जास्त सिलेंडर विकले जात आहेत सरकारने विशेषतः स्थलांतरित कामगार आणि कमी उत्पन्न गटापर्यंत पोहोच वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
PNG कडे ग्राहकांचा कल वाढला
या कालावधीत ४.३४ लाखांहून अधिक नवीन PNG कनेक्शन देण्यात आले ३०,००० पेक्षा अधिक ग्राहकांनी LPG कनेक्शन सरेंडर करून PNG स्वीकारले. यावरून पाइप गॅसकडे ग्राहकांचा वाढता कल स्पष्ट होत आहे.
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम
सहा आठवड्यांपासून सुरू असलेल्या पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. भारत आपल्या गरजेपैकी सुमारे ५० % कच्चे तेल, ४०% नैसर्गिक वायू आणि ८५-९०% LPG या भागातून आयात करतो. त्यामुळे या संकटाचा थेट परिणाम देशावर झाला आहे.
घरगुती वापराला प्राधान्य
सरकारने घरगुती ग्राहकांना LPG पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्राधान्य दिले आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंट्ससारख्या व्यावसायिक वापरासाठी पुरवठ्यात काही प्रमाणात कपात करण्यात आली आहे.
कमर्शियल LPG विक्रीत वाढ
फेब्रुवारी महिन्यात दररोज सुमारे ७७,००० सिलेंडर विक्री होत होती. मात्र, गेल्या २-३ आठवड्यांत ही संख्या वाढून १ लाखांपेक्षा अधिक झाली आहे. ११ एप्रिल रोजी देशभरात ५२ लाखांहून अधिक LPG सिलेंडरची डिलिव्हरी करण्यात आली. सरकारच्या मते, सध्या देशातील घरगुती LPG पुरवठा स्थिर असून कुठेही तुटवड्याची नोंद नाही.