१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 06:37 IST2026-04-08T06:36:50+5:302026-04-08T06:37:09+5:30
महाराष्ट्रात ४८.१% ग्रामीण कुटुंबांकडे जमीन नाही; सामाजिक आणि ऐतिहासिक कारणांमुळे दरी वाढली; वर्ल्ड इनइक्वॅलिटी लॅबचा धक्कादायक अहवाल

१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: देशातील आर्थिक विषमतेसोबतच आता जमिनीच्या मालकीमधील विषमतेचे वास्तव समोर आले आहे. ‘वर्ल्ड इनइक्वॅलिटी लॅब’च्या अहवालानुसार, भारतातील ग्रामीण भागातील ४६ टक्के कुटुंबे भूमिहीन आहेत. दुसरीकडे, केवळ १० टक्के श्रीमंत कुटुंबांचा ग्रामीण भागातील ४४ टक्के जमिनीवर ताबा आहे. या अहवालासाठी ६५ कोटी लोकसंख्या आणि २.७० लाख गावांमधील डेटाचा अभ्यास करण्यात आला आहे.
ग्रामीण भागातील जमिनीच्या विषमतेचा ‘गिनी इंडेक्स’ (विषमता मोजण्याचे प्रमाण) ७१ वर पोहोचला आहे. काही गावांत परिस्थिती इतकी गंभीर आहे की, एकाच जमीनदाराच्या ताब्यात गावाची ५०%पेक्षा अधिक जमीन आहे. सरासरी विचार करता, गावातील सर्वांत मोठ्या जमीनदाराकडे एकूण जमिनीच्या १२ टक्के हिस्सा असतो.
जमीन कोणाच्या ताब्यात?
लोकसंख्या जमीन मालकी
- सर्वांत श्रीमंत १% १८%
- सर्वांत श्रीमंत ५% ३२%
- सर्वांत श्रीमंत १०% ४४%
- ४६% कुटुंबे ०%
महाराष्ट्रात नेमकी काय स्थिती आहे?
महाराष्ट्रात जमीनवाटपातील विषमता ठळकपणे दिसते. गिनी निर्देशांक ०.७०९ असून राज्यात जमीन समानपणे वितरित नाही. सुमारे ४८.१% कुटुंबे भूमिहीन असून, शेतीवर अवलंबून असूनही त्यांच्या ताब्यात जमीन नाही. वरच्या १०% कुटुंबांकडे ४०.८% जमीन आहे. केवळ १% श्रीमंतांकडे १४.७% जमीन केंद्रित आहे. एका मोठ्या जमीनधारकाचा सरासरी वाटा ८.८% आहे. काही गावांत मोठ्या जमीनदारांचे वर्चस्व दिसत असले तरी ते प्रमाण कमी (२.२%) आहे. बाजाराभिमुख शेती असूनही ही परिस्थिती आव्हानात्मक ठरत आहे.
नेमकी का वाढली ही दरी, प्रमुख कारणे काय आहेत?
- ब्रिटिश राजवटीत थेट नियंत्रणाखाली असलेल्या गावांमध्ये जमीन विषमता अधिक आहे. याउलट, संस्थानिकांच्या राजवटीत असलेल्या भागात हे प्रमाण तुलनेने कमी आढळले.
- अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील कुटुंबांमध्ये भूमिहीनतेचे प्रमाण सर्वाधिक आहे. सामाजिक उतरंडीचा परिणाम जमिनीच्या मालकीवर आजही स्पष्ट दिसतो.
- ज्या भागात जमिनी सुपीक आहेत किंवा शेतीसाठी पोषक वातावरण आहे, तिथे मोठ्या जमीनदारांकडे अधिक जमीन आहे. धक्कादायक म्हणजे, रस्ते किंवा बाजारपेठेच्या जवळ असूनही ही विषमता कमी झालेली नाही.