35.4 percent women are still illiterate In the country | देशात ३५.४ टक्के महिला अद्यापही निरक्षर

देशात ३५.४ टक्के महिला अद्यापही निरक्षर

ठळक मुद्देदृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्रातर्फे अहवाल प्रसिद्ध शिक्षण, रोजगार आणि आरोग्य या तीन विषयांवर अभ्यासामध्ये लक्ष्य केंद्रित१८  वर्षे आणि त्यापुढील वयाच्या महिलांचा विचार२९ राज्ये, ५ केंद्रशासित प्रदेशातील ४६४ जिल्ह्यांमध्ये ७ हजारांपेक्षा जास्त महिलांचा अभ्यास

पुणे : एकविसाव्या शतकात महिलांनी विविध क्षेत्रे पादाक्रांत केली असली तरी भारतासारख्या प्रगत देशात महिला साक्षरतेचे प्रमाण ६४.६ टक्के असून, ३५.४ टक्के महिला निरक्षर आहेत. आपण शंभरीच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचू शकलेलो नाही. साक्षर महिलांपैकी ४६.०५ टक्के महिला बारावीपेक्षा कमी शिकलेल्या आहेत. पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या महिलांची संख्या वाढली असली तरी दहावी ते बारावीच्या शिक्षणातील मुलींची टक्केवारी कमी झाली आहे. केवळ ५0.६८ टक्के महिलांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे, तर ४९.३२ टक्के महिलांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले आहे. विवाह आणि आर्थिक समस्या ही शिक्षण थांबविण्याची प्रमुख कारणे असल्याचे समोर आले आहे. 
‘दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्रातर्फे ‘भारतातील महिलांची स्थिती’ या विषयावर करण्यात आलेल्या राष्ट्रव्यापी अध्ययन अहवालातून हे निष्कर्ष पुढे आले आहेत. शिक्षण, रोजगार आणि आरोग्य या तीन विषयांवर अभ्यासामध्ये लक्ष्य केंद्रित करण्यात आले होते. यामध्ये १८  वर्षे आणि त्यापुढील वयाच्या महिलांचा विचार करण्यात आला. देशातील उत्तर, दक्षिण, पश्चिम, पूर्व आणि ईशान्य हे पाच विभाग, २९ राज्ये, ५ केंद्रशासित प्रदेशातील ४६४ जिल्ह्यांमध्ये ७ हजारांपेक्षा जास्त महिला कार्यकर्त्यांच्या प्रत्यक्ष सहभागातून शास्त्रीय पद्धतीने हा अभ्यास करण्यात आला. यामध्ये एकूण ७४ हजार ९५ महिलांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यात आला. त्यातील ७ हजार ६७५ मुली या १८ वर्षांखालील आहेत. या अभ्यासात सहभागी झालेल्या महिला स्वयंसेवकांसाठी ५२१ प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आले असल्याची माहिती प्रकल्प संचालक डॉ. मनीषा कोठेकर यांनी दिली.
‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ सारख्या अभियानांमुळे मुलींची पावले शाळांकडे वळली असल्याचे सकारात्मक चित्र पाहायला मिळत असले तरी अद्यापही मुलींच्या शिक्षणाने शंभरी गाठलेली नाही. अजूनही महिला साक्षरतेचे प्रमाण हे केवळ ६४.६ टक्के इतकेच आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील भटक्या जमातीतील २५ वर्षांपुढील वयाच्या महिलांमध्ये १०० टक्के महिला निरक्षर आहेत. आदिवासी महिलांमधील साक्षरतेचे प्रमाण (४९.३५ टक्के) अनुसूचित जातीतील महिलांच्या साक्षरतेच्या प्रमाणापेक्षा कमी असल्याचे निष्कर्ष अभ्यासातून समोर आले आहेत. 
विवाह आणि आर्थिक समस्यांमुळे महिलांना शिक्षण थांबवण्याची वेळ
केवळ ५० टक्के महिलांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले असून, ४९.३२ टक्के महिलांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले आहे. ३०.७६ टक्के महिलांनी माध्यमिक शाळेत असतानाच शिक्षण थांबविले. साधारणपणे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर गळतीचे प्रमाण अधिक आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांनी माध्यमिक स्तरावर शिक्षण सोडले तर अनुसूचित जमातीतील बहुतेक महिलांनी प्राथमिक स्तरावरच शिक्षण थांबविले. विवाह, आर्थिक समस्या आणि घराजवळ शैक्षणिक सुविधा उपलब्ध नसणे तसेच कौटुंबिक जबाबदाºया वाढल्याने शिक्षण घेता आलेले नाही. दरम्यान, खुल्या प्रवर्गातील महिलांनी पदवीचे शिक्षण घेतानाच आणि पदवीनंतर शिक्षण थांबवले. 
...........
भारताची लोकसंख्या १२१.०६ कोटी इतकी आहे. त्यातील ४८.५ टक्के महिलांचे प्रमाण आहे. याचा अर्थ अर्धी लोकसंख्या महिलांची आहे. समाजाचा त्या महत्त्वपूर्ण घटक आहेत. सध्या त्यांची सामाजिक, शैक्षणिक स्थिती काय आहे? कोणत्या समस्या आहेत का? ही स्थिती अधिक चांगली करण्यासाठी कोणते प्रयत्न करणे गरजेचे आहे. हे जाणून घेण्यासाठी सर्वेक्षणातून हा अहवाल तयार करण्यात आला. या मुख्य अहवालाबरोबर राज्यनिहाय स्वतंत्र अहवालदेखील तयार केले जाणार असून, केंद्र सरकारसह राज्य सरकार आणि महिला आयोगाला हे अहवाल सादर केले जातील. या अहवालातील निष्क र्षांनुसार सरकारला कोणत्या गोष्टींवर भर देण्याची गरज आहे हे समजू शकेल.- डॉ. मनीषा कोठेकर, प्रकल्प संचालक

Web Title: 35.4 percent women are still illiterate In the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.