१०० किमी पायी प्रवास, महाराष्ट्राच्या बाजूने घुसले जवान अन्... ३१ जहाल नक्षलवाद्यांचा बैठकीतच खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 15:25 IST2025-02-11T15:21:41+5:302025-02-11T15:25:29+5:30
छत्तीसगडच्या इंद्रावती राष्ट्रीय उद्यानात दोन दिवसांपूर्वी झालेल्या चकमकीत ३१ नक्षलवादी ठार झाले होते.

१०० किमी पायी प्रवास, महाराष्ट्राच्या बाजूने घुसले जवान अन्... ३१ जहाल नक्षलवाद्यांचा बैठकीतच खात्मा
31 Naxlists killed : छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील इंद्रावती राष्ट्रीय उद्यानात दोन दिवसांपूर्वी झालेल्या चकमकीत ३१ नक्षलवादी ठार झाले. महाराष्ट्राच्या सीमेवरुन सुरू करण्यात आलेल्या कारवाईने नक्षलवादी हैराण झाले. दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारात दोन जवान शहीद झाले, तर दोघे जखमी झाले. रविवारी इंद्रावती नॅशनल पार्क परिसरात एका टेकडीवर ही चकमक झाली. चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये अनेक धोकादायक आणि ११ महिलांचाही समावेश होता.
अबुझमाडला लागून असलेले इंद्रावती राष्ट्रीय उद्यान हे नक्षलवाद्यांचे महत्त्वाचं ठिकाण आहे. २७९९.०८ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले हे उद्यान महाराष्ट्राच्या सीमेवर आहे. १९८३ मध्ये इंद्रावती नॅशनल पार्कला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलं होतं. मात्र हे बऱ्याच काळापासून नक्षलवाद्याचे आश्रयस्थान बनलं होतं. रविवारी झालेल्या कारवाईत तब्बल ३१ नक्षलवाद्यांना ठार करण्याच सुरक्षा दलाला यश आलं. काही दिवसांपूर्वीच या जंगलात तीन नक्षलवाद्यांच्या खात्मा करण्यात आला होता.
आम्हाला तेलंगणा राज्य समिती, पश्चिम बस्तर विभाग आणि नॅशनल पार्क एरिया कमिटीमधल्या नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाली होती. त्यांनी इंद्रावती नॅशनल पार्कच्या जंगलात टॅक्टिकल काउंटर ऑफेंसिव्ह कॅम्पेनआधी एक बैठक बोलावली होती. नक्षलवादी मार्च ते जून दरम्यान टॅक्टिकल काउंटर ऑफेंसिव्ह कॅम्पेन करतात, ज्या दरम्यान ते त्यांच्या कारवाया वाढवतात.
७ फेब्रुवारी रोजी छत्तीसगड पोलिसांच्या तुकड्या, जिल्हा राखीव रक्षक, स्पेशल टास्क फोर्स आणि बस्तर फायटर यांना या भागाच्या वेगवेगळ्या दिशेने पाठवण्यात आले होते. "स्ट्रॅटेजी म्हणून सरप्राईज एलिमेंटचा वापर करण्यात आला. इंद्रावती नॅशनल पार्कमधील महाराष्ट्र पोलिसांच्या लॉन्चिंग पॅडवरून काही टीम्सना पाचारण करण्यात आले होते," अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
रविवारी सकाळी गस्ती पथके नक्षलवादी दिसतील अशा टेकडीवर पोहोचली. टेकडीला घेरून सुरक्षा कर्मचारी पुढे जात राहिले आणि सकाळी ८ वाजता गोळीबार सुरू झाला. गोळीबारादरम्यान नक्षलवादी दोन गटात विभागले गेले. तेलंगणा समिती कॅडर असलेल्या एका गटाने माघार घ्यायला सुरुवात केली, तर दुसऱ्या गटाने गोळीबार सुरूच ठेवला. तितक्यात महाराष्ट्राच्या बाजूने घुसलेल्या पथकाला पाहून नक्षलवाद्यांना धक्का बसला. कारण एवढ्या मोठ्या संख्येने सुरक्षा दल येईल असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं. संध्याकाळी चारपर्यंत अधूनमधून गोळीबार सुरूच होता.
ही चकमक घडली ते ठिकाण बिजापूर जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ८० किमी आणि महाराष्ट्र सीमेपासून ४० किमी अंतरावर आहे. तीन दिवसांच्या कारवाईनंतर सुमारे १०० किलोमीटर चालत सुरक्षा दल तिथं पोहोचलं होतं. मारले गेलेले नक्षलवादी, शहीद सैनिक आणि जखमींचे मृतदेह एअरलिफ्ट करण्यात आले.