छत्तीसगडमध्ये चकमकीत ३१ नक्षलींचा खात्मा; २ महिन्यांत ८१ नक्षलींना पाठवले यमसदनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 05:20 IST2025-02-10T05:19:55+5:302025-02-10T05:20:54+5:30

मृतांत ११ महिलांचा समावेश, दाेन सुरक्षा कर्मचारी शहीद

31 Naxalites killed in encounter in Chhattisgarh; 81 Naxalites death in last 2 months | छत्तीसगडमध्ये चकमकीत ३१ नक्षलींचा खात्मा; २ महिन्यांत ८१ नक्षलींना पाठवले यमसदनी

छत्तीसगडमध्ये चकमकीत ३१ नक्षलींचा खात्मा; २ महिन्यांत ८१ नक्षलींना पाठवले यमसदनी

बिजापूर (छत्तीसगड) : नक्षलवाद्यांविरुद्धच्या मोठ्या कारवाईत सुरक्षा दलांनी घनघोर चकमकीमध्ये ३१ नक्षलींचा खात्मा केला. मृतांत ११ महिलांचा समावेश आहे. छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात रविवारी या चकमकीच्या वेळी दोन सुरक्षा कर्मचारी शहीद झाले व दोन जण जखमी झाले.

या चकमकीबरोबरच छत्तीसगडमध्ये यावर्षी आतापर्यंत यमसदनी पाठवण्यात आलेल्या नक्षलवाद्यांची संख्या ८१ वर गेली आहे. मृत सर्व नक्षलवादी गणवेशधारी होते व घटनास्थळाहून स्वयंचलित शस्त्रे सापडली आहेत. इंद्रावती नॅशनल पार्क परिसरात सकाळी विविध सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकांनी नक्षलविरोधी मोहीम हाती घेतली होती, असे बस्तरचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी सांगितले. 

जिल्हा राखीव गार्ड (डीआरजी), विशेष कृती दल (एसटीएफ) व बस्तर फायटर्स या राज्य सरकारच्या दलांनी या मोहिमेत सहभाग घेतला. ही मोहीम ७ फेब्रुवारीपासून हाती घेण्यात आली होती. चकमकीच्या ठिकाणी आतापर्यंत ३१ नक्षलवाद्यांचे त्यांच्या गणवेशातील मृतदेह हाती लागले आहेत. त्याचबरोबर एके-४७, इन्सास, एसएलआर, पॉइंट ३०३ रायफल्स ही शस्त्रास्त्रे व बॅरल ग्रेनेड लाँचर्स आणि स्फोटकांचा मोठा साठाही सापडला आहे. चकमकीत डीआरजीचे हेड कॉन्स्टेबल नरेश ध्रुव व एसटीएफचे कॉन्स्टेबल वासित रावते शहीद झाले. डीआरजीचे जग्गू कलमू व एसटीएफचे गुलाब मांडवी चकमकीत जखमी झाले. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. त्यांना रायपूरमध्ये हलवण्यात आले आहे. 

नक्षलवाद मार्च २०२६ पर्यंत नष्ट करू : अमित शाह
३१ मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद नष्ट करू. देशातील कोणत्याही नागरिकाला नक्षलवादामुळे जीव गमवावा लागणार नाही, असा आशावाद केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी एक्सवर व्यक्त केला. पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, नक्षलमुक्त भारताच्या दिशेने सुरक्षा दलाने विजापूरमध्ये मोठे यश मिळविले आहे. आज आम्ही दोन शूर जवान गमविले आहेत. हा देश या जवानांचा नेहमीच ऋणी राहील.

६५० जवानांनी केली कारवाई

छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी सांगितले की, तब्बल ६५० सुरक्षा कर्मचाऱ्यांनी इंद्रावती नॅशनल पार्क परिसरात विविध बाजूंनी प्रवेश केला आणि ३१ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. 

अधिक कुमक बोलावली : रविवारी सकाळी ८ वाजता पर्वतीय भागात सुरू झालेली चकमक दुपारी ४ पर्यंत चालली. चकमकीच्या ठिकाणी सुरक्षा दलांची अधिक कुमक बोलावण्यात आली असून, संपूर्ण परिसर पिंजून काढला जात आहे. 

जानेवारी महिन्यात झालेल्या चकमकी

४ जानेवारी : अबुझमदच्या जंगलात चकमक, एका महिलेसह ५ नक्षलवादी ठार, एक डीआरजी जवान शहीद.
६ जानेवारी : सैनिकांच्या वाहनाला आयईडी स्फोटाने उडव. ८ सैनिक शहीद, एक चालकही ठार.
९ जानेवारी : सुकमा-विजापूर सीमेवर ३ नक्षलवादी ठार.
१२ जानेवारी : विजापूरच्या माडेड भागात चकमक, २ महिला नक्षलवाद्यांसह ५ नक्षलवादी ठार.
१६ जानेवारी : छत्तीसगड-तेलंगण सीमेवरील कांकेर पुजारी गावात १८ नक्षलवादी ठार.
२०-२१ जानेवारी : गरियाबंद जिल्ह्यात चकमक, १६ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले.

Web Title: 31 Naxalites killed in encounter in Chhattisgarh; 81 Naxalites death in last 2 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.