30 बलात्कार, 15 हत्या करणाऱ्या खतरनाक 'सायको जयशंकर'ने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2018 16:08 IST2018-02-28T16:06:05+5:302018-02-28T16:08:25+5:30
30 पेक्षा जास्त बलात्कार आणि 15 हत्या प्रकरणात सहभागी असलेला खतरनाक गुन्हेगार एम जयशंकरने मंगळवारी बंगळुरु जवळच्या पारापन्ना आग्रहारा तुरुंगात आत्महत्या केली.

30 बलात्कार, 15 हत्या करणाऱ्या खतरनाक 'सायको जयशंकर'ने केली आत्महत्या
चेन्नई - 30 पेक्षा जास्त बलात्कार आणि 15 हत्या प्रकरणात सहभागी असलेला खतरनाक गुन्हेगार एम जयशंकरने मंगळवारी बंगळुरु जवळच्या पारापन्ना आग्रहारा तुरुंगात आत्महत्या केली. तामिळनाडू आणि कर्नाटकामध्ये त्याने हे गुन्हे केले होते. दाढी करायच्या ब्लेडने गळा चिरुन त्याने आत्महत्या केली. 2017 साली याच जयशंकरवर कन्नडमध्ये 'सायको शंकर' हा चित्रपट आला होता.
रात्री सव्वादोनच्या सुमारास काही कैद्यांना जयशंकर रक्ताच्या थारोळयात पडलेला दिसला. त्यांनी लगेच तुरुंग अधिकाऱ्यांना माहिती दिली. तुरुंगातील डॉक्टरांनी जयशंकरला तपासल्यानंतर लगेच त्याला रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्याला व्हिक्टोरिया रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. शिक्षा भोगत असताना एकदा तो तुरुंगातून पळूनही गेला होता. पण पाच सप्टेंबर 2013 रोजी बंगळुरु जवळच्या कुडलीगेटजवळ त्याला पोलिसांनी पुन्हा अटक केली.
तुरुंग प्रशासनाने जयशंकरच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याने दाढीचा ब्लेड चोरुन शर्टाच्या आत लपवून ठेवला होता. आत्महत्या करताना कोणीही त्याला पाहिले नाही असे तुरुंगातील अधिकाऱ्यांनी पोलिसांना सांगितले.