कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 17:43 IST2025-08-07T17:42:19+5:302025-08-07T17:43:26+5:30
पंडित प्रदीप मिश्रा यांनी कुबेरेश्वर धाम येथे कावड यात्रेचे आयोजन केले होते.

कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
MP NEWS: मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रसिद्ध कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धामला आलेल्या ७ भाविकांचा मृत्यू झाला आहे. आज(गुरुवार) सकाळी दोन, तर काल(बुधवार) तीन भाविकांचा मृत्यू झाला. तसेच, मंगळवारीदेखील दोन महिला भाविकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनांमुळे भाविक चिंतेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली ६ ऑगस्ट रोजी कावड यात्रा आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये लाखो भाविक सहभागी झाले होते. कुबेरेश्वर धामच्या कावड यात्रेत सहभागी होण्यासाठी आलेल्या भाविकांपैकी ७ भाविकांचा मृत्यू झाला आहे.
भाविकांचा मृत्यू कसा झाला?
जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, गुरुवारी २२ वर्षीय उपेंद्र गुप्ता आणि ४० वर्षीय अनिल महावीर यांची अचानक प्रकृती बिघडल्याने कुबेरेश्वर धाम येथून जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, तिथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. हृदयविकाराच्या झटक्याने दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
तर, बुधवारी या कावड यात्रेत सहभागी झालेल्या तीन भाविकांची प्रकृती वेगवेगळ्या वेळी अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी तिन्ही भाविकांना मृत घोषित केले. या तिघांचा मृत्यूही हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा अंदाज आहे. याशिवाय, मंगळवारी दोन महिला भाविकांचा मृत्यू झाला होता.