३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 14:07 IST2025-12-20T14:06:07+5:302025-12-20T14:07:57+5:30
Bihar Dr. Nusrat Parveen News: बिहारच्या महिला डॉ. नुसरत परवीन यांच्यासोबत घडलेली घटना अमानवी आणि हृदयद्रावक आहे, अशी टीका करण्यात आली आहे.

३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Bihar Dr. Nusrat Parveen News: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात एका मुस्लिम महिला डॉक्टरचा बुरखा ओढल्याच्या प्रकरणावरून देशभरात प्रतिक्रिया उमटत आहेत. बिहारमध्ये नवनियुक्त आयुष डॉक्टरांना नियुक्तीपत्रे वाटपाचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी १० व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेले नितीश कुमार एका महिला डॉक्टरला नियुक्तीपत्र देताना अचानक तिचा बुरखा ओढताना दिसले. त्यांच्या शेजारी उभे असलेले उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्नही केला, मात्र तोपर्यंत ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली होती. यानंतर आता एका राज्याने बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना मोठी ऑफर दिली आहे.
या घटनेमुळे महिला डॉक्टर नुसरत परवीन यांना मानसिक धक्का बसला असून, त्यांनी बिहार सोडून थेट कोलकाता गाठले. विशेष म्हणजे, ज्या सरकारी नोकरीचे स्वप्न त्यांनी पाहिले होते, ती नोकरी जॉइन करण्यासही त्यांनी सध्या नकार दिला आहे. यानंतर आता झारखंडमधील हेमंत सोरेन सरकारने डॉ. नुसरत यांना सरकारी नोकरीची मोठी ऑफर दिली आहे.
डॉ. नुसरत परवीन यांच्यासोबत घडलेली घटना अमानवी आणि हृदयद्रावक
झारखंड सरकारचे आरोग्य मंत्री डॉ. इरफान अन्सारी यांनी डॉ. नुसरत यांना झारखंड आरोग्य सेवेत ३ लाख रुपये दरमहा पगाराची नोकरी, त्यांच्या पसंतीची पोस्टिंग, सरकारी निवासस्थान आणि संपूर्ण सुरक्षा देऊ केली आहे. एका निवेदनात सांगितले की, या नियुक्तीत त्यांना आदर आणि सुरक्षा दोन्हीची हमी दिली जाईल. बिहारच्या महिला डॉ. नुसरत परवीन यांच्यासोबत घडलेली घटना अमानवी आणि हृदयद्रावक आहे. यामुळे संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. ज्या प्रकारे एका डॉक्टर महिलेचा अपमान करण्यात आले, ते केवळ एका व्यक्तीवर हल्ला नाही तर मानवी प्रतिष्ठा, महिलांचा आदर आणि संविधानावर थेट हल्ला आहे, या शब्दांत डॉ. अन्सारी यांनी या घटनेवर तीव्र टीका केली.
दरम्यान, झारखंडचे आरोग्यमंत्री पुढे म्हणाले की, मी प्रथम एक डॉक्टर आहे, नंतर मंत्री आहे. कोणत्याही डॉक्टर किंवा महिलेच्या प्रतिष्ठेशी तडजोड करणे झारखंडमध्ये शक्य नाही. एका डॉक्टरशी संबंधित ही घटना सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना खूप दुखावणारी आहे. ती महिला आणि तिच्या कुटुंबावर काय परिस्थिती आली असेल, त्याची कल्पनाच करू शकत नाही, असेही ते म्हणाले.