दोन रेल्वे अपघातांत २९ ठार
By Admin | Updated: August 5, 2015 23:21 IST2015-08-05T23:21:14+5:302015-08-05T23:21:14+5:30
मध्यप्रदेशातील हरदा येथे मंगळवारी रात्री रेल्वे पूल ओलांडताना पुराच्या पाण्यात बुडालेल्या रेल्वे मार्गावर दोन रेल्वेगाड्यांचे डबे अवघ्या काही

दोन रेल्वे अपघातांत २९ ठार
हरदा (म. प्र.) : मध्यप्रदेशातील हरदा येथे मंगळवारी रात्री रेल्वे पूल ओलांडताना पुराच्या पाण्यात बुडालेल्या रेल्वे मार्गावर दोन रेल्वेगाड्यांचे डबे अवघ्या काही मिनिटांच्या अंतराने माचक नदीत कोसळून झालेल्या दुहेरी अपघातात २९ प्रवासी ठार, तर २५ जखमी झाले.
वाराणसीला जाणारी कामयानी एक्स्प्रेस आणि पाटण्याहून मुंबईला जात असलेली जनता एक्स्प्रेस या दोन गाड्यांना झालेल्या अपघातांमध्ये नेमके किती लोक मृत्युमुखी पडले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
चौकशीचे आदेश
रेल्वे मंत्रालयाने या अपघाताच्या चौकशीचे आदेश देतानाच मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.
१० रेल्वेगाड्या रद्द
मध्यप्रदेशातील हरदाजवळ दोन रेल्वे अपघातांनंतर मध्य रेल्वेने या क्षेत्रातून धावणाऱ्या १० गाड्या दोन दिवसांसाठी रद्द केल्या आहेत.
बुधवारी रद्द झालेल्या गाड्यांमध्ये ११०७१ एलटीटी-वाराणसी कामयानी एक्स्प्रेस, ११०८१ एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस, ११०५२ मुंबई-आझमगड साप्ताहिक एक्स्प्रेस, ११०३३ पुणे-दरभंगा, १३२०२ मुंबई एलटीटी-राजेंद्रनगर पाटणा जनता एक्स्प्रेस, ११०१५ एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस आणि १२५९८ सीएसटी-गोरखपूर एक्स्प्रेसचा समावेश आहे. याशिवाय गुरुवारची १२१६७ एलटीटी-वाराणसी सुपरफास्ट, ५११८७ भुसावळ-कटनी पॅसेंजर आणि एलटीटी-वाराणसी सुपर फास्ट एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)