काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 13:26 IST2025-12-19T13:26:34+5:302025-12-19T13:26:54+5:30
Jammu Kashmir News: जम्मू काश्मीरमधील किश्तवाड येथील एका बांधकाम सुरू असलेल्या हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्पाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ८५० मेगावॅट क्षमतेच्या रतले हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्पामध्ये काम करत असलेल्या २९ जणांचे दहशतवाद्यांशी संबंध आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर
जम्मू काश्मीरमधील किश्तवाड येथील एका बांधकाम सुरू असलेल्या हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्पाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ८५० मेगावॅट क्षमतेच्या रतले हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्पामध्ये काम करत असलेल्या २९ जणांचे दहशतवाद्यांशी संबंध आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. या माहितीमुळे खळबळ उडाली आहे. भाजपाच्या किश्तवाडमधील आमदार शगून परिहार यांनी या प्रकल्पासाठी भरती करण्यात आलेल्या मजुरांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आता पोलिसांनी दिलेला हा इशारा म्हणजे आपण उपस्थित केलेल्या तक्रारींचा पुरावाच आहे, असा दावा परिहार यांनी केला आहे.
जम्मू काश्मीर पोलिसांनी मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला पत्र लिहून किश्तवाडमधील द्रबशाला क्षेत्रात बांधण्यात येत असलेल्या जलविद्युत प्रकल्पामधील २९ जण हे देशविरोधी कृत्यांमध्ये गुंतलेले आहेत, अशी माहिती दिली होती. तसेच या भरतीमुळे प्रकल्पाची सुरक्षा धोक्यात येऊ शकते, असा इशाराही पोलिसांनी दिला होता.
किश्तवाडचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक नरेश सिंह यांनी एमईआयएलच्या महाव्यवस्थापकांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, स्थानिक रहिवाशांच्या नियमित पोलीस पडताळणीदरम्यान, संबंधित पोलीस ठाण्यांमधून अहवाल आला आहे. त्यामध्ये या २९ जणांच्या नावांचा समावेश आहे जलविद्युत प्रकल्पांच्या रणनीतिक आणि राष्ट्रीय महत्त्व पाहता हे प्रकल्प शत्रूराष्ट्राच्या टार्गेटवर असू शकतात, असे ही एसएसपी यांनी या पत्रात नमूद केले होते. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे. हे कर्मचारी काहीही करू शकतात, तसेच त्यामुळे प्रकल्पासाठी धोका निर्माण होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.
त्याबरोबरच पोलिसांनी या कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्याची आणि काही संशयास्पद हालचाली दिसल्या तर त्वरित माहिती देण्याची सूचनाही कंपनीला दिली आहे. हे २९ कर्मचारी कनिष्ठ पदांवर कार्यरत आहेत. यातील पाच जण दहशतवाद्यांशी संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातील तिघे जण एका जुन्या दहशतवाद्याचे नातेवाईक, एक संशयास्पद ओव्हर ग्राऊंड वर्करचा मुलगा आणि एक जण आत्मसमर्पित दहशतवाद्याचा मुलगा असल्याचे सांगण्यात येत आहे. तर एका व्यक्तीवर फसवणूस आणि पाण्याचे स्त्रोत दूषित केल्याचा आणि कागदपत्रांमध्ये फसवणूक केल्याचा आरोप आहे. तर इतर २३ जण हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्यांच्यावर अतिक्रमण, सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचं नुकसान, असे विविध आरोप आहेत.