Sanjay Raut Speech on Operation Sindoor: "पहलगाममध्ये २६ लोकांची हत्या झाली. कशी झाली? आतापर्यंत सरकार सांगू शकलेले नाही", असे म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र डागलं. पंडित नेहरू, डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख करत राऊतांनी भाजपला टोला लगावला आणि थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू आहे. या चर्चेत बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, "पूर्ण काश्मीर गृह मंत्रालयाच्या अधिकार क्षेत्रात आहे. ३७० हटवल्यानंतर काश्मीरला केंद्र शासित प्रदेश करण्यात आले. तिथले पोलीस गृह मंत्रालयाच्या आदेशाचे पालन करते. संपूर्ण काश्मिरमध्ये आर्म्ड फोर्सेस कायदा लागू केला आहे."
"तिथले राज्यपालही तुमचे आहेत. कणखर माणूस आहे, तरीही हल्ला झाला आणि हल्लेखोर निघून गेले. राज्यपालांनीही त्यांची चूक मान्य केली आहे. सुरक्षेत चूक झाली आहे. जर सुरक्षेमध्ये चूक झाली आहे. २६ लोक मारले गेले आहेत. २६ आई बहिणींचं कुंकू पुसलं गेलं आहे. मग त्याची जबाबदारी कोण घेणार? आणि राजीनामा कोण देणार?", असा सवाल संजय राऊत यांनी केला.
केंद्र सरकारला राऊतांचा टोला
याच मुद्द्यावर पुढे बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, "पंडित नेहरू देणार का? राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देणार की, जेडी व्हान्स देणार का? कोण देणार?", असा टोला लगावत राऊतांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
"देशाच्या गृह मंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, ती त्यांची जबाबादारी आहे. या देशात २४ तासांत उपराष्ट्रपतींचा राजीनामा घेतला जातो, कारण ते तुमचं म्हणणं ऐकत नाहीत; पण २६ लोकांची हत्या झाली, पण कुणाचा राजीनामा नाही. कुणाची माफी नाही. ही या देशाची स्थिती आहे", अशी टीका संजय राऊत यांनी केली.
संजय राऊतांची पंतप्रधान मोदींवर टीका
"आपले पंतप्रधान स्वतःला ईश्वराचे अवतार मानतात. त्यांचे भक्त त्यांना ईश्वराचा अवतार मानतात. पंतप्रधानांचं म्हणणं आहे की, मला वेळेआधीच घटना कळतात. ही माझ्यावर ईश्वराची असलेली कृपा आहे. मग दहशतवादी पहलगाममध्ये लोकांना मारणार आहेत, हे त्यांना का कळलं नाही?", असा सवाल संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींना केला.