‘एनडीए’चे २३७ उमेदवार जाहीर; प्रचाराला चढला रंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 05:35 IST2025-10-17T05:34:48+5:302025-10-17T05:35:02+5:30
भाजप-जदयूची सर्व १०१ नावे घोषित, मित्रपक्षांचेही उमेदवार ठरले; भाजपकडून १६ ठिकाणी युवा उमेदवार; ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर

‘एनडीए’चे २३७ उमेदवार जाहीर; प्रचाराला चढला रंग
- एस. पी. सिन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटणा : बिहारमध्ये २४३ जागांसाठी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) आतापर्यंत २३७ उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजप-जनता दल युनायटेडने आपले प्रत्येकी १०१ उमेदवार जाहीर केले असून, ‘हम’ व रालोमो या मित्रपक्षांनी आपल्या वाट्याच्या प्रत्येकी ६ उमेदवारांची नावे जाहीर केली. चिराग पासवान यांच्या लोजपा (रामविलास) यांच्या पक्षाने आतापर्यंत १५ उमेदवार जाहीर केले आहेत.
एनडीएच्या जागावाटपात भाजप व जदयू यांना समान १०१ जागा आल्या आहेत. चिराग पासवान यांच्या लोजपाला २९, जीतनराम मांझी यांच्या ‘हम’ आणि उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चाला प्रत्येकी ६ जागा आल्या आहेत.
जदयूने पहिल्या यादीत ५७ उमेदवार जाहीर केले होते. गुरुवारी ४४ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. पहिल्या यादीत एकही अल्पसंख्याक उमेदवार नसल्याने प्रचंड चर्चा झडली होती. आता दुसऱ्या यादीत चार अल्पसंख्याक उमेदवारांचा पक्षाने समावेश केला आहे. इंडिया आघाडीने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाहीत.
भाजपने १६ आमदारांची तिकिटे कापली
भाजपने यंदाच्या निवडणुकीत १६ विद्यमान आमदारांची तिकिटे कापली आहेत. पक्षाने बहुतांश युवा उमेदवार मैदानात उतरवले आहेत. ‘जेन-झी’ मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने रणनीती आखली असून, अनेक ठिकाणी नवे चेहरे दिले आहेत. यात मिश्रीलाल यादव यांच्या जागेवर गायिका मैथिली ठाकूर, तर स्वर्णासिंह यांच्या जागी त्यांचे पती सुजितसिंह यांना उमेदवारी दिली आहे. २० वर्षांपासून आमदार असलेले अरुण सिन्हा यांच्याऐवजी संजय गुप्ता यांना उमेदवारी दिली आहे.
अमित शाह पाटण्यात दाखल
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तीन दिवसांच्या दौऱ्यावर पाटण्यात दाखल झाले असून, या काळात त्यांच्या विविध मतदारसंघांत प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.