टीबीमुक्तीसाठी २३,३६८ कोटी खर्च, तरी ३४ लाख मृत्यू; भारतात दर ५ मिनिटांत जातो ३ रुग्णांचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 09:40 IST2025-07-28T09:37:22+5:302025-07-28T09:40:24+5:30
जगातील प्रत्येक चौथा टीबी रुग्ण भारतात आढळतो

टीबीमुक्तीसाठी २३,३६८ कोटी खर्च, तरी ३४ लाख मृत्यू; भारतात दर ५ मिनिटांत जातो ३ रुग्णांचा जीव
हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: सरकारने टीबीच्या विरोधात लढा देण्यासाठी आणि देशातून क्षयरोग (टीबी) निर्मूलनासाठी गेल्या दशकात तब्बल २३,३६८ कोटी रुपये खर्च करूनही, ३४.५ लाख लोकांना जीव गमवावा लागला आहे. टीबी निर्मूलनासाठी वार्षिक खर्च २.२३ पट वाढवूनही आजही जगातील प्रत्येक चौथा टीबी रुग्ण भारतात आढळतो आणि दर पाच मिनिटांनी तीनजण टीबीमुळे मृत्युमुखी पडत आहेत.
राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात संरक्षण, आयुष, आदिवासी व्यवहार, रेल्वे, कामगार, पंचायती राज, कोळसा, अवजड उद्योग, एमएसएमई आणि इतर अनेक मंत्रालयांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त ३४७ जिल्ह्यांमध्ये १०० दिवसांची क्षयरोग-मुक्त भारत मोहीम सुरू करण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, वर्ष २०२३ मध्ये जगभरातील एकूण टीबी रुग्णांपैकी २६ टक्के रुग्णसंख्या भारतात होती.
यंदाच्याच वर्षी क्षयरोगमुक्तीचे ठेवले आहे लक्ष्य
सरकारने २०२५ पर्यंत भारताला क्षयरोगमुक्त करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. तथापि, देशात अजूनही क्षयरोगाचे रुग्ण आणि मृत्यूची संख्या जास्त आहे. महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की, भारत २०२५ पर्यंत खरोखरच क्षयरोगमुक्तीचे ध्येय साध्य करेल का? हा कळीचा प्रश्न आहे.