जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या निर्णयांमध्ये पाकिस्तानसोबतच्या राजनैतिक आणि व्यावसायिक संबंधांवर पुनर्विचार करणे, भारतात वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करणे आणि त्यांना देशातून परत पाठवणे, देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना शोधण्याची प्रक्रिया जलद करणे यांचा समावेश आहे. पाकिस्तानी नागरिकांना भारतातून परत पाठवण्याच्या कारवाईदरम्यान उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुरादाबादमध्ये अशा २२ महिला आढळल्या आहेत, ज्यांचे राष्ट्रीयत्व अजूनही पाकिस्तानी आहे, परंतु त्या अनेक दशकांपासून भारतात राहत आहेत.
इतकंच नाही तर, या सर्व महिलांनी भारतीय पुरुषांशी लग्न केले आहे आणि त्या इथेच राहत आहेत. या महिलांना एकूण ९५ मुले आहेत, त्यापैकी अनेकजण आता प्रौढ झाले आहेत. शिवाय काही तर विवाहितही आहेत. यांच्यापैकी काही महिला तर आजीही झाल्या आहेत. आता प्रश्न असा निर्माण होतो की,काही दशकांपूर्वी भारतात आलेल्या या महिला आणि त्यांच्या मुलांना भारतीय नागरिकत्व मिळेल का, की त्यांना अजूनही पाकिस्तानी म्हटले जाईल? यामुळे आता मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.
भारतीय नागरिकत्व कायदा काय म्हणतो?
भारतीय नागरिकत्व मिळविण्यासाठी देशात नागरिकत्व कायदा, १९५५ लागू आहे. याअंतर्गत, नागरिकत्व प्रामुख्याने पाच प्रकारे दिले जाऊ शकते. जर, एखाद्या व्यक्तीचा जन्म भारतात झाला, तर त्याला जन्माने नागरिकत्व मिळू शकते. वंशावळीनुसार,जर आई किंवा वडील भारतीय नागरिक असतील तर, मुलाला नागरिकत्व मिळू शकते. भारतीय नागरिकाशी विवाह केलेले आणि काही वर्षांपासून भारतात राहत असलेले परदेशी नागरिक गृह मंत्रालयाकडे अर्ज करून नागरिकत्व मिळवू शकतात. भारतात दीर्घकाळ (सामान्यतः ११ वर्षे) कायदेशीररित्या वास्तव्य करणारे परदेशी नागरिक काही अटी पूर्ण करून नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतात. भारतीय भूभागाचा कोणताही भाग भारतात विलीन झाल्यास तेथील लोकांना भारतीय नागरिकत्व मिळते.
मुरादाबादमधील २२ पाकिस्तानी महिलांचं काय होणार?
मुरादाबादमधील २२ पाकिस्तानी महिलांनी भारतीय पुरुषांशी लग्न केले आहे. त्या गेल्या अनेक दशकांपासून भारतात राहत आहेत. त्यांच्या मुलांचा जन्म भारतात झाल्याने, नागरिकत्व जन्म आणि वंशाच्या आधारावर निश्चित केले जाऊ शकते. परंतु, जर त्या महिलांनी अद्याप नागरिकत्वासाठी औपचारिकपणे अर्ज केला नसेल, तर त्यांना कायदेशीररित्या परदेशी मानले जाईल. अशा अनियमित रहिवाशांनाही भारत सोडून पाकिस्तानला रवाना होऊ लागू शकते.