"शिवसेनेचे नाव आणि चिन्ह मिळविण्यासाठी 2,000 कोटी रुपये खर्च केले"; दिल्ली उच्च न्यायालयात राऊतांचा यू टर्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 13:34 IST2023-04-17T13:33:40+5:302023-04-17T13:34:34+5:30
"आपण, भारतीय निवडणूक आयोगाला (ECI) 2000 कोटी रुपये दिले असल्याचे कोणतेही विधान केलेले नाही."

"शिवसेनेचे नाव आणि चिन्ह मिळविण्यासाठी 2,000 कोटी रुपये खर्च केले"; दिल्ली उच्च न्यायालयात राऊतांचा यू टर्न
शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी फेब्रुवारी महिन्यात, शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळविण्यासाठी 2,000 कोटी रुपये खर्च केले गेल्याचा दावा केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर, त्यांच्यावर दिवाणी मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. यानंतर आता, खोटे गुने दाखल करून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच, शिवसेनेच्या (उबाठा) नेत्यांविरोधातही कट रचला जात आहे, असे संजय राऊत यांनी दिल्लीउच्च न्यायालयाला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाचे लोकसभेतील नेते राहुल शेवाळे यांनी हा खटला दाखल केला आहे. यात शिवसेनेचे (उबाठा) नेते आपल्या पक्षाविरोधात भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करत असल्याचे शेवाळे यांनी म्हटले आहे. यानंतर, 28 मार्चला उच्च न्यायालयाने याचिका स्वीकारत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना नोटीस जारी करत उत्तर मागीतले होते.
आपण 'असे' कोणतेही विधान केलेले नाही -
हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आपल्या उत्तरात राऊत यांनी संविधानाच्या कलम 19(1)(ए) नुसार, त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उल्लेख केला. तसेच, विश्वसनीय माहितीचा हवाला देत राऊत म्हणाले, शिंदे गटाने सत्तेच्या लालसेपोटी कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक मोबदल्यात "असंवैधानिक कृत्य" केल्याचा आपला विश्वास आहे. आपण, भारतीय निवडणूक आयोगाला (ECI) 2000 कोटी रुपये दिले असल्याचे कोणतेही विधान केलेले नाही. तसेच, राजकीय पक्ष ही एक निर्जीव संघटना आहे. यामुळे ती बदनामीच्या खटल्याचा विषय होऊ शकत नाही. मानहानी, व्यक्तीच्या प्रतिष्ठेशी संबंधित आहे. शिवसेनेची बदनामी करण्यासाठी हा खटला चुकीच्या हेतूने दाखल करण्यात आला आहे, असेही राऊत यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत -
संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत, "माझी खात्रीची माहिती आहे.... चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आतापर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत... हा प्राथमिक आकडा आहे आणि 100 टक्के सत्य आहे.. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील... देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते..."