पत्नीच्या डेथ सर्टिफिकेटसाठी मागितली २ हजारांची लाच, पैसे न दिल्यास पतीलाच दाखवलं मृत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 12:37 IST2025-01-08T12:35:56+5:302025-01-08T12:37:03+5:30
पत्नीचं डेथ सर्टिफिकेट बनवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीकडे २ हजार रुपयांची लाच मागितल्याची घटना समोर आली आहे.

पत्नीच्या डेथ सर्टिफिकेटसाठी मागितली २ हजारांची लाच, पैसे न दिल्यास पतीलाच दाखवलं मृत
उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीचं डेथ सर्टिफिकेट बनवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीकडे २ हजार रुपयांची लाच मागितल्याची घटना समोर आली आहे. जेव्हा त्या व्यक्तीने लाच दिली नाही तेव्हा महिला ग्रामपंचायत सचिवाने पत्नीऐवजी पतीचं डेथ सर्टिफिकेट बनवलं. ही तक्रार डीएमपर्यंत पोहोचल्यावर कारवाई करण्यात आली. महिला ग्रामपंचायत सचिवाला निलंबित करण्यात आलं.
हे संपूर्ण प्रकरण अटवा गावातील आहे. येथील ग्रामपंचायत सचिवाला लाच न मिळाल्याने पत्नीचं डेथ सर्टिफिकेट घेण्यासाठी आलेल्या पतीलाच मृत दाखवलं. सचिवाने पत्नीऐवजी पतीचं डेथ सर्टिफिकेट तयार केलं. जेव्हा पतीने त्याच्या नावाचे डेथ सर्टिफिकेट पाहिलं तेव्हा त्याने संपूर्ण प्रकरणाची तक्रार डीएमकडे केली. यावर डीएमने कडक भूमिका घेत कारवाईचे आदेश दिले.
हरदोईच्या अटवा गावातील रहिवासी विश्वनाथ यांची पत्नी शांती देवी यांचं १९ डिसेंबर २०२४ रोजी निधन झालं. विश्वनाथ यांच्या म्हणण्यानुसार, ते ग्रामपंचायत सचिव सरिता देवी यांच्याकडे त्यांच्या पत्नीचे डेथ सर्टिफिकेट बनवण्यासाठी गेले, परंतु त्यांनी त्यांना डेथ सर्टिफिकेट देण्यास विलंब केला. दोन-तीन दिवसांनी डेथ सर्टिफिकेट देण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी केली.
यानंतर ३ जानेवारी रोजी ग्रामपंचायत सचिव सरिता देवी यांनी त्यांची मृत पत्नी शांती देवी यांच्या जागी त्यांच्याच डेथ सर्टिफिकेट विश्वनाथ यांना दिलं. विश्वनाथ यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी सुरुवातीला हे डेथ सर्टिफिकेट नीट पाहिलं नाही. परंतु जेव्हा ते घरी पोहोचले तेव्हा त्यांनी तपासले असता डेथ सर्टिफिकेटमध्ये त्यांच्या पत्नीच्या जागी त्यांचं नाव दिसलं. या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी मंगला प्रसाद सिंह यांच्याकडे करण्यात आली.