कोरोना रोखण्यासाठी २०० दिवस संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 11:22 PM2020-09-28T23:22:05+5:302020-09-28T23:22:33+5:30

नवी मुंबईत पालिकेची तारेवरची कसरत सुरू : मृत्युदर कमी करण्यात यश; व्हेंटिलेटर्ससह आयसीयूची कमतरता कायम

200 days of struggle to stop Corona | कोरोना रोखण्यासाठी २०० दिवस संघर्ष

कोरोना रोखण्यासाठी २०० दिवस संघर्ष

Next

नामदेव मोरे 

नवी मुंबई : कोरोनामुक्त नवी मुंबई करण्यासाठी २०० दिवस अविरतपणे संघर्ष सुरू आहे. मृत्युदर कमी करण्यात काही प्रमाणात यश आले असले, तरी रुग्णांना व्हेंटिलेटर्ससह आयसीयू युनिटची कमतरता भासत आहे. लॉकडाऊनमुळे ठप्प झालेले जनजीवनही सुरळीत होत आहे. लोकल बंद असल्यामुळे कामाच्या ठिकाणी वेळेत पोहोचण्यासाठी चाकरमान्यांची तारेवरची कसरत सुरू असल्याचे चित्र शहरात दिसते आहे.

नवी मुंबईमध्ये १३ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. या महामारीला २८ सप्टेंबरला २०० दिवस पूर्ण झाले. या कालावधीमध्ये शहरातील रुग्णसंख्येने ३५ हजारांचा टप्पा पूर्ण केला. ३१ हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले व सातशेपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पहिला रुग्ण सापडल्यापासून महानगरपालिका प्रशासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन शासनाच्या सूचनेप्रमाणे त्रिस्तरीय रुग्णालयीन व्यवस्था तयार केली.
सुरुवातीला भीतीमुळे शहरातील खासगी रुग्णालये बंद झाल्यानंतर, शहरवासीयांच्या सुविधेसाठी फ्लू क्लिनिकची संकल्पना राबविण्यात आली. १,२०० बेडचे सुसज्ज रुग्णालये उभारण्यात आले. आरोग्य विभागातील डॉक्टर्स, नर्स व मनपाच्या इतर विभागांतील अधिकारी व कर्मचारीही अविश्रांतपणे परिश्रम घेत आहेत. अनेकांनी या कालावधीमध्ये एकही दिवस सुट्टी घेतलेली नाही. शहरातील मृत्युदर तीनवरून दोन टक्क्यांवर आणण्यात यश आले आहे. मनपाने आतापर्यंत जवळपास १ लाख ९० हजार नागरिकांची कोरोना चाचणी पूर्ण केली आहे. ४ लाख ७० हजार नागरिकांना क्वारंटाइन केले आहे. स्वत:ची आरटीपीसीआर चाचणी लॅब सुरू केली असून, अँटिजन चाचण्यांचे प्रमाणही वाढले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर ठप्प झालेले जनजीवन सुरळीत होऊ लागले आहे. बार, स्विमिंग पूल, सिनेमागृह वगळता, इतर सर्व व्यवसाय व आस्थापना सुरू झाल्या आहेत. हॉटेल पूर्ण क्षमतेने सुरू नसली, तरी पार्सल सेवा सुरू झाली आहे. मुंबईमधील चाकरमानी पुन्हा कामावर जाऊ लागले आहेत, परंतु लोकल सेवा बंद असल्यामुळे कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. कोरोनाचे संकट विसरून रोजी-रोटीसाठी नागरिक घराबाहेर पडू लागले आहेत. सद्यस्थितीमध्ये प्रतिदिन ३०० ते ४०० रुग्ण वाढत आहेत. सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी रुग्णालयांमध्ये भरपूर बेड उपलब्ध आहेत, परंतु व्हेंटिलेटर्स व आयसीयूसाठी अनेक रुग्णालयात वेटिंग लिस्ट सुरू झाली आहे. मनपा प्रशासनाने या सुविधा मोठ्या प्रमाणात विनाविलंब वाढविण्याची मागणी केली जात आहे, अन्यथा कमी झालेला मृत्युदर पुन्हा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कोरोना नियंत्रणासाठी मनपाने केलेल्या उपाययोजना आणि आलेले यश
च्मनपा व खासगी रुग्णालयांमध्ये जवळपास ६ हजार बेड उपलब्ध केले
च्वाशी सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये १,२०० बेडचे रुग्णालय उभे केले
च्नेरुळ माता-बाल रुग्णालयात प्रतिदिन एक हजार क्षमतेची आरटीपीसीआर लॅब तयार केली
च्दोनशे दिवसांमध्ये जवळपास १ लाख ९० हजार नागरिकांची चाचणी करण्यात यश
च्मृत्युदर तीनवरून दोन टक्क्यांवर आणण्यात यश मिळविले
च्रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८ टक्के करण्यात यश

च्लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर बेघर व निराश्रितांना निवारा व अन्नपुरवठा
च्सर्व घटकांना विश्वासात घेऊन शहरात व्यापक जनजागृती
च्रुग्ण व नातेवाइकांशी संवाद साधण्यासाठी स्वतंत्र कॉल सेंटर सुरू केले
च्मनपाच्या रुग्णालयासह २१ खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचाराची यंत्रणा
च्रुग्णांची लुबाडणूक करणाºया रुग्णांवर कारवाई करून नागरिकांना पैसे मिळवून दिले.

शहरातील प्रतिहजार रुग्णवाढीचा तपशील
दिनांक रुग्ण
१३ मार्च १
१५ मे १०००
२३ जून ५०००
१५ जुलै १००००
३१ जुलै १५०००
१४ आॅगस्ट २००००
२९ आॅगस्ट २५०००
१२ सप्टेंबर ३००००
२६ सप्टेंबर ३५०००

रुग्णालयातील बेडची स्थिती
प्रकार क्षमता वापर शिल्लक
आयसीयू ३६५ ३३८ २७
व्हेंटिलेटर्स १३३ १२४ ९
आॅक्सिजन २११८ ९९८ ११२०
आॅक्सिजन विरहित ३३०८ १४११ १८९७

कोरोनाची सद्यस्थिती
एकूण चाचण्या १९१०७९
एकूण रुग्ण ३५९३४
कोरोनामुक्त ३१६७२
मृत्यू ७४०
मृत्यूदर २.०५
शिल्लक रुग्ण ३५२२
क्वॉरंटाइन ३६१११
क्वारंटाइन पूर्ण ४३९००७

दोन प्रमुखांनी काढला पळ
कोरोना वाढल्यानंतर मनपातल्या अनेकांनी २०० दिवसांत सुट्टी घेतलेली नाही, तर कोरोनाची जबाबदारी असणाºया दोन मुख्य अधिकाऱ्यांनी नवी मुंबईतून बदली घेतली. यामुळे त्यांनी पळ काढल्याची टीका झाली.

चाकरमान्यांची गैरसोय
बहुतांश सर्व कार्यालये सुरू झाली आहेत. शहरवासी नोकरी व्यवसायासाठी घराबाहेर पडत आहेत, परंतु लोकल बंद असल्यामुळे मुंबई व उपनगरांमध्ये जाण्यासाठी वाहतुकीची पुरेशी सुविधा नाही. मोटारसायकलवरून अनेक जण प्रतिदिन ५० ते ८० किलोमीटर प्रवास करत आहेत. बसेसची संख्याही अपुरी असल्यामुळे कार्यालयात पोहोचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

कोरोनाव्यतिरिक्त रुग्णांचे हाल सुरूच
कोरोनामुक्त नवी मुंबई करण्याच्या प्रयत्नामध्ये इतर आजार असणाºया रुग्णांकडे दुर्लक्ष झाले आहे. इतर आजारांसाठी पूर्ण क्षमतेने सुरू असलेले मनपाचे एकही रुग्णालय सुरू नाही. प्रमुख खासगी रुग्णालयांनीही कोरोनावर लक्ष केंद्रित केल्यामुळे सद्यस्थितीमध्ये कोरोनाव्यतिरिक्त आजार असणाºया रुग्णांची गैरसोय सुरूच आहे. जनरल हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू न झाल्यास उपचाराअभावी मृत्युमुखी पडणाºयांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: 200 days of struggle to stop Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.