ऑपरेशन सिंदूर थांबविल्यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणांनी जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे सर्च ऑपरेशन राबविण्यास सुरुवात केली होती. दोन ऑपरेशनमध्ये सहा दहशतवाद्यांना ठार मारण्यास सैन्य दल आणि पोलिसांना यश आले आहे.
काश्मीरमध्ये मोठे दहशतवादी कारस्थान उधळून लावण्यात आले आहे. हे सर्व दहशतवादी उंच भागात लपले होते. त्यांना शोधून शोधून टिपण्यात आल्याचे सैन्य आणि पोलिसांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
गेल्या ४८ तासांत आम्ही दोन ऑपरेशन राबविली. यामध्ये केलार आणि त्राल भागात लपलेल्या एकूण सहा दहशतवाद्यांना मारले आहे. काश्मीरमधील दहशतवादाला संपविण्यासाठी, दहशतीचे वातावरण संपविण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असे काश्मीरचे आयजीपी व्हीके बिरदी यांनी सांगितले.
१२ मे रोजी आम्हाला दहशतवादी गट केलार आणि त्राल भागात असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार आम्ही या दहशतवाद्यांवर लक्ष ठेवून होतो. १३ मेच्या सकाळी दहशतवाद्यांच्या हालचाली वाढल्याचे समजताच कारवाई केली. त्यांना घेरले असता त्यांनी आमच्यावर गोळीबार केला, प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात ते ठार झाले आहेत, असे जीओसी मेजर जनरल धनंजय जोशी यांनी सांगितले. एका गावाला घेरले तेव्हा दहशतवादी घरांमध्ये लपले आणि गोळीबार करू लागले. आमच्यासमोर सामान्य ग्रामस्थांना वाचविण्याचे आव्हान होते, असेही ते म्हणाले. तसेच या दहशतवाद्यांमध्य शाहिद कुट्टे नावाचा विविध दहशतवादी कारवायांत सहभागी मोस्ट वॉन्टेड दहशतवादी होता, असेही त्यांनी सांगितले.