पहलगाम हल्ल्यानंतर २ आदिलची जगभरात चर्चा; एकाने छातीवर गोळ्या झेलल्या, दुसऱ्याने...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 07:40 IST2025-04-26T07:39:19+5:302025-04-26T07:40:10+5:30
पुलवामा हल्ल्यानंतर सर्वांत मोठ्या हल्ल्यात पाच ते सात अतिरेक्यांनी पर्यटकांवर गोळ्या चालवल्या. त्यांना पाकमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या किमान दोन स्थानिक अतिरेक्यांनी मदत केली. फरार असलेला आदिल त्यापैकीच एक आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर २ आदिलची जगभरात चर्चा; एकाने छातीवर गोळ्या झेलल्या, दुसऱ्याने...
श्रीनगर - पहलगाममधील परस्परविरोधी प्रवाहातील दोन आदिलची सध्या संपूर्ण जगभरात चर्चा आहे. एकाने पर्यटकांना वाचवताना आपल्या छातीवर गोळ्या झेलल्या आणि दुसऱ्याने निरपराध पर्यटकांवर निर्दयीपणे गोळ्या झाडल्या. आदिल ठोकर ऊर्फ आदिल गुरी हा लष्कर-ए-तैयबाचा अतिरेकी आहे तर सय्यद आदिल हुसेन शाह हा धाडसी होता.
तिरस्कारास पात्र आदिल; अशी पटली ओळख
बैसरन घाटीमध्ये झालेल्या हल्ल्यातील प्रमुख आरोपी आदिलचे घर एका स्फोटात उद्ध्वस्त झाले. हा स्फोट कशामुळे झाला, हे स्पष्ट नसले तरी अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरक्षा दलांनी शोधमोहीम राबवली असताना तेथे आधीच असलेल्या स्फोटकांचा स्फोट झाला. २०१८ मध्ये तो वैध प्रवास दस्तावेजावर पाकिस्तानला गेला. तेव्हा तो किशोरवयीन होता व नंतर तो बेपत्ता झाला. त्यानंतर तो लष्कर-ए-तैयबा या अतिरेकी संघटनेत सामील झाल्याचे वृत्त आले.
२०२० मध्ये तो नियंत्रण रेषेवरून भारतात परतला व जम्मू-काश्मीरच्या डोडा व किश्तवार भागात सक्रिय राहिला.
पुलवामा हल्ल्यानंतर सर्वांत मोठ्या हल्ल्यात पाच ते सात अतिरेक्यांनी पर्यटकांवर गोळ्या चालवल्या. त्यांना पाकमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या किमान दोन स्थानिक अतिरेक्यांनी मदत केली. फरार असलेला आदिल त्यापैकीच एक आहे. ठार करण्यात आलेल्या पर्यटकांपैकी एका पर्यटकाच्या पत्नीने त्याची ओळख पटवली. त्या महिलेला सहा-सात फोटो दाखवण्यात आले. त्यापैकी आदिल हा ट्रिगर दाबणारा दहशतवादी म्हणून ओळख पटवण्यात आली. हल्ल्यानंतर बंदूकधारी पीर पंजालच्या घनदाट जंगलात फरार झाले. दक्षिण काश्मीरमधील बिजबेहरा येथील गुरी गावातील रहिवासी आदिल ठोकर हा विशीच्या आतील आहे.
पर्यटकांसाठी गोळ्या झेललेला आदिल
कुटुंबातील एकमेव कमाई करणारा आदिल पर्यटकांची सहा किलोमीटर अंतरावर पहलगाम शहरापासून विस्तीर्ण हिरव्या कुरणात ने-आण करीत होता.
सय्यद नौशाद म्हणाले की, एका मृत पर्यटकाच्या मुलाने मला माझ्या भावाच्या शौर्याबाबत सांगितले. अतिरेक्याने आदिलच्या छातीत तीन गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात ठार झालेला तो एकमेव काश्मिरी आहे.
आदिलची बहीण अस्मा म्हणाली की, मला सकाळपासून अज्ञात भीतीने ग्रासले होते. मी त्याला सकाळीच म्हणाले होते, आज काहीतरी वाईट घडणार असे वाटतेय. पण त्याने माझे ऐकले नाही आणि निघून गेला. तो इतरांसाठी मदत करायला नेहमी पुढे असायचा. आदिलचे शोकसंतप्त वडील म्हणाले की, माझ्या मुलांपैकी सर्वांत दयाळू आदिल होता आणि तोच राहिला नाही. माझ्या मुलाने हत्येला विरोध केला म्हणून अतिरेक्यांनी त्याला मारले. तो संध्याकाळी परतला नाही, तेव्हा आम्ही त्याला फोन करायला सुरुवात केली. परंतु फोन कोणीही उचलला नाही. गावकऱ्यांनी या कुटुंबाला संकटाच्या काळात एकटे सोडले नाही. त्याच्या अंत्ययात्रेला शेकडो लोक आले होते.
सीमा हैदरसह इतर नागरिकांची होणार पाकिस्तानला रवानगी
पहलगाममधील हल्ल्यानंतर केंद्र सरकारने दिलेल्या आदेशानुसार पाकिस्तानी नागरिक मायदेशात रवाना होत आहेत. उत्तर प्रदेशातून १८०० पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविले जाणार आहे. आपल्या नातेवाइकांना भेटण्यासाठी व्हिसा घेऊन ते भारतात आले होते. शरणार्थी म्हणून राहात असलेल्या सीमा हैदर हिचीदेखील पाकिस्तानात आता रवानगी करण्यात येईल. उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशात सध्या वास्तव्यास असलेल्या १८०० पाकिस्तानी नागरिकांना रविवारी पाकिस्तानला परत पाठविण्यात येणार आहे. सीमा हैदर ही एक पाकिस्तानी नागरिक असून, तिने २०२३ मध्ये नेपाळमार्गे बेकायदेशीररीत्या भारतात प्रवेश केला होता.