190 schools will be opened in Srinagar today under strict security | कडक सुरक्षाव्यवस्थेत आज उघडणार श्रीनगरमधील 190 शाळा

कडक सुरक्षाव्यवस्थेत आज उघडणार श्रीनगरमधील 190 शाळा

श्रीनगर - जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवण्यात आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून बंद करण्यात आलेल्या श्रीनगरमधील शाळा आज उघडणार आहेत. सुमारे 14 दिवसांच्या खंडानंतर श्रीनगरमधील 190 शाळांची घंटी खणाणणार आहे आहे. तसेच परिस्थिती आणखी निवळल्यावर इतर जिल्ह्यांमधील शाळाही सुरू केल्या जातील. दरम्यान, कुठल्याही आणीबाणीच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी लष्करासह अन्य सुरक्षा दले 24 ताच मोर्चावर तैनात आहेत. 

जम्मू काश्मीरचे मुख्य सचिव रोहित कंसल यांनी रविवारी सांगितले की, ''सध्या केवळ श्रीनगरमधील प्राथमिक शाळा सुरू करण्यात येत आहेत. ज्या क्षेत्रांमधील शाळा सुरू करण्यात येत आहेत. त्यामध्ये लासजान, सांगरी, पंथचौक, नौगाम, राजबाग, जवाहरनगर, गगरीबाल, धारा, थीड, बाटमालू आणि शाल्टेंग यांचा समावेश आहे. तसेच परिस्थिती सुधारल्यावर अन्य विभागातील शाळा उघडल्या जातील.''  दरम्यान, काश्मीर खोऱ्यातील दैनंदिन व्यवहारांवरील शिथील करण्यात आलेल्या  निर्बंधांवरील सूट कायम राहणार आहे. 

 रोहित कंसल यांनी पुढे सांगितले की, ''श्रीनगरचे उपायुक्त शाहिद इक्बाल चौधरी यांनी शनिवारी शिक्षण विभागातील अधिकारी आणि शाळांच्या प्रमुखांची बैठक बोलावली होती. या बैठकीत जिल्ह्यातील शाळांना सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली. दरम्यान, सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांची सुरक्षा ही जिल्हा प्रशासनासाठी चिंतेची बाब आहे. तसेच विद्यार्थ्यांची सुरक्षा निश्चित करण्यासाठी सर्वा आवश्यक उपाय करण्यात आले आहेत. 

 दरम्यान,  जम्मूमध्ये पसरवण्यात येत असलेल्या अफवांच्या पार्श्वभूमीवर जम्मूमधील पाच जिल्ह्यातील इंटरनेट सेवा रविवारी पुन्हा बंद करण्यात आली होती. एका दिवसापूर्वीच जम्मूमधील इंटरनेट सेवा कमी गतीने सुरू करण्यात आली होती. मात्र आता अफवांना रोखून शांतता कायम राखण्यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  

कलम 370 आणि कलम 35 अ बाबत केंद्र सरकारने निर्णय जाहीर करण्यापूर्वी एक दिवस आधी खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण जम्मू काश्मीरमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. तसेच राज्यातील बहुतांश भागात संचारबंदी लागू करण्यात आली होती. मात्र काही दिवसांनंतर हळूहळू निर्बंध हटवण्यात आले होते. तसेच या शुक्रवारी आणि शनिवारी रात्री जम्मू, सांबा, कठुआ, उधमपूर आणि रियासी या जिल्ह्यातील इंटरनेट सेवा संथगतीने सुरू करण्यात आली होती.
 

Web Title: 190 schools will be opened in Srinagar today under strict security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.