१८ हत्या, तिहार तुरुंगाच्या आसपास फेकायचा मृतदेहाचे तुकडे, फरार सीरियल किलर अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 15:10 IST2025-01-18T15:09:38+5:302025-01-18T15:10:05+5:30
Crime News: दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचने पॅरोल मिळाल्यावर फरार झालेला सीरियल किलर चंद्रकांत झाल याला अटक केली आहे. चंद्रकांत यांने तिहार तुरुंगाच्या आसपास अनेक हत्या केल्या होत्या.

१८ हत्या, तिहार तुरुंगाच्या आसपास फेकायचा मृतदेहाचे तुकडे, फरार सीरियल किलर अटकेत
दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचने पॅरोल मिळाल्यावर फरार झालेला सीरियल किलर चंद्रकांत झाल याला अटक केली आहे. चंद्रकांत यांने तिहार तुरुंगाच्या आसपास अनेक हत्या केल्या होत्या. सन २०२३ मध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. दरम्यान, २०२३ मध्ये त्याला ९० दिवसांची पॅरोल मिळाली होती. मात्र पॅरोलचा कालावधी संपल्यानंतर तो तुरुंगात परतला नव्हता. चंद्रकांत झा याचा गुन्हेगारीचा रेकॉर्ड अत्यंत भयावह असा होता. त्याने हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे तिहार तुरुंगाच्या आसपास फेकले होते.
चंद्रकांत झा याने १९९८ ते २००७ या काळात पश्चिम दिल्लीमध्ये ८ जणांची हत्या केली होती. चंद्रकांत आधी एखाद्या व्यक्तीशी मैत्री करायचा, त्यानंतर त्याची हत्या करायचा. त्याने २००३ मध्ये शेखर आणि उमेश, २००५ मध्ये गुड्डू, २००६ मध्ये अमित, २००७ मध्ये उपेंद्र आणि दिलीप यांची हत्या केली होती. तो बिहार आणि उत्तर प्रदेशमधून येणाऱ्या मजुरांशी मैत्री करायचा. त्यांना नोकरी मिळवून देण्याचं आमिष दाखवायचा. त्यानंतर त्यांची हत्या करायचा.
चंद्रकांत झा याने ज्या हत्या केल्या त्याची पद्धत खूप भयानक होती. तो हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करायचा त्यानंतर ते तिहार तुरुंगाच्या आसपास फेकायचा. त्यानंतर प्रत्येक मृतदेहाजवळ मी हत्या केही आहे, पकडू शकत असाल तर पकडून दाखवा, असं आव्हान देणारं पत्र ठेवायचा.
दरम्यान, २०१३ मध्ये चंद्रकांत झा याला तीन हत्यांच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं. त्यानंतर त्याला फाशी आणि आजीवन कारावासाची शिक्षा देण्यात आली. पुढे २०१६ मध्ये त्याला सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा कमी करून जन्मठेपेत परिवर्तीत करण्यात आली होती. तेव्हापासून तो तुरुंगात होता. चंद्रकांत झा याने दोन विवाह केले होते. त्याने पहिला पत्नीला एक वर्षातच सोडले होते. तर दुसऱ्या पत्नीपासून त्याला पाच मुली आहेत. मात्र तो कुटुंबीयांपासून दूरच राहत असे.