हृदयद्रावक! खेळताना प्लास्टिकचा बॉल गिळला; दीड वर्षांच्या लेकीचा पालकांसमोर तडफडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 12:55 IST2025-07-04T12:55:25+5:302025-07-04T12:55:54+5:30
गुजरातच्या राजकोटमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका चिमुकलीचा खेळता खेळता मृत्यू झाला.

हृदयद्रावक! खेळताना प्लास्टिकचा बॉल गिळला; दीड वर्षांच्या लेकीचा पालकांसमोर तडफडून मृत्यू
गुजरातच्या राजकोटमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका चिमुकलीचा खेळता खेळता मृत्यू झाला. कुटुंबाला नेमकं काय झालं हे समजेपर्यंत खूप उशीर झाला होता. मुलीने खेळताना प्लास्टिकचा बॉल गिळला होता, त्यानंतर तिची प्रकृती गंभीर झाली आणि कुटुंबाने तिला उपचारासाठी ताबडतोब रुग्णालयात नेलं पण तोपर्यंत मुलीची प्रकृती आणखी गंभीर झाली. डॉक्टरांनी मुलीवर उपचार सुरू केले पण पालकांसमोरच लेकीचा तडफडून मृत्यू झाला.
राजकोटच्या मावडी भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. तेजसभाई चावडा यांची दीड वर्षाची मुलगी पार्थवी घरामध्ये प्लास्टिकच्या बॉलने खेळत होती. बॉलने खेळत असतानाच अचानक पार्थवीने तो बॉय गिळला. त्यानंतर तिची प्रकृती बिघडू लागली. कुटुंबाने तिला लगेचच रुग्णालयात नेलं. तिच्यावर उपचार देखील सुरू करण्यात आले. मात्र पार्थवीचा मृत्यू झाला.
कुटुंबाला मोठा धक्का
डॉक्टरांनी पार्थवीला मृत घोषित केलं. मुलीच्या मृत्यूची माहिती मिळताच संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्यावर दु:खाला डोंगर कोसळला आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी राजकोट पोलिसांना संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आवश्यक कायदेशीर कारवाई केली आहे.
पार्थवी पालकांची होती लाडकी
मिळालेल्या माहितीनुसार, पार्थवीचे वडील एका कारखान्यात काम करतात. पार्थवी तिच्या पालकांची खूप लाडकी मुलगी होती. कुटुंबातील सदस्यांनी सांगितलं की, बॉल गिळल्यानंतर पार्थवीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. पोलिसांनी याप्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे.