वर्षभरात रस्ते अपघातात 1 लाख 68 हजार लोकांचा मृत्यू, नितीन गडकरींची लोकसभेत धक्कादायक माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 20:30 IST2024-12-05T20:29:50+5:302024-12-05T20:30:43+5:30
2018 ते 2022 या काळात देशात 7 लाख 77 हजार 423 लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.

वर्षभरात रस्ते अपघातात 1 लाख 68 हजार लोकांचा मृत्यू, नितीन गडकरींची लोकसभेत धक्कादायक माहिती
नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत रस्ते अपघातांबाबत धक्कादायक खुलासा केला. वर्षभरामध्ये देशातील 1 लाख 68 हजार लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी लोकसभेत दिली. तसेच, 2018 ते 2022 या काळात देशात 7 लाख 77 हजार 423 लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.
नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2022 मध्ये देशात एकूण 4 लाख 61 हजार 312 रस्ते अपघात झाले आहेत. अन्य एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या बांधकामात आढळलेल्या त्रुटींसाठी चार कंत्राटदारांना जबाबदार धरण्याबाबत सांगितले. दरम्यान, लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान नितीन गडकरी यांनी खासदारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्यावेळी त्यांनी अपघातांची संपूर्ण माहिती दिली.
मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2018-2022 दरम्यान रस्ते अपघातात 7,77,423 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. नितीन गडकरी म्हणाले की, या लोकांचा मृत्यू कोणत्याही दंगलीत किंवा लढाईत झाला नाही तर रस्ते अपघातात झाला आहे. केंद्र सरकारने रस्ता सुरक्षा समिती नेमली आहे आणि ब्लॅक स्पॉट्ससाठी 40 हजार कोटी रुपये दिले आहेत. तरीही रस्ते अपघातात वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले.