आंध्र प्रदेशात बस अपघातात १५ ठार
By Admin | Updated: January 7, 2015 23:57 IST2015-01-07T23:57:43+5:302015-01-07T23:57:43+5:30
आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातून बुधवारी डोंगराळ भागातून जाणारी एक बस खड्ड्यात पडून झालेल्या अपघातात १५ प्रवासी ठार तर ३० जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

आंध्र प्रदेशात बस अपघातात १५ ठार
हैदराबाद : आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातून बुधवारी डोंगराळ भागातून जाणारी एक बस खड्ड्यात पडून झालेल्या अपघातात १५ प्रवासी ठार तर ३० जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांत नऊ महाविद्यालयीन तरुण, एक तरुणी व अन्य प्रवासी आहेत. पेनुकोंडाचे पोलीस उपाधीक्षक एन. सुब्बाराव यांनी जखमींना बेंगळुरू,अनंतपूर, पेनुकोंडा येथील रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले. हा अपघात बुधवारी सकाळी ८.३० च्या सुमारास मदकसीरा व पेनुकोंडा दरम्यानच्या घाटात झाला. या ठिकाणी रस्त्याचे सपाटीकरण करण्याचे काम सुरू होते त्यासाठी रस्त्याला लागून एक लांब मार्ग खणण्यात आला होता. आंध्र प्रदेशचे गृहमंत्री एन. चिन्ना राजप्पा यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. (वृत्तसंस्था)
राज्य सरकारने मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची सानुग्रह रक्कम देण्याची घोषणा केली आहे.
आंध्रचे मुख्यमंत्री ए. चंद्राबाबू नायडू यांनीही या अपघाताविषयी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. आंध्र प्रदेश राज्य परिवहन मंडळाच्या या बसमधून ५० जण प्रवास करीत होते. बसचालकाने एका आॅटोरिक्षाला ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न केल्याने हा अपघात घडल्याचे अनंतपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक एस.व्ही. राजशेखर बाबू यांनी सांगितले.
पंतप्रधानांना दु:ख
नवी दिल्ली-आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्णात झालेल्या रस्ते अपघाताची माहिती कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यात ठार झालेल्या व्यक्तींकरिता दु:ख व त्यांच्या कुटुंबीयांविषयी सहानुभूती व्यक्त केली. या अपघातात ठार झालेल्यांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.