फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 18:31 IST2025-12-23T18:29:59+5:302025-12-23T18:31:48+5:30
फास्ट फूड खाण्याच्या आवडीमुळे एका अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला आपला जीव गमवावा लागला आहे.

फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे फास्ट फूड खाण्याच्या आवडीमुळे एका अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला आपला जीव गमवावा लागला आहे. चाऊमीन, मॅगी, पिझ्झा आणि बर्गर यांसारख्या फास्ट फूडच्या अतिसेवनामुळे या विद्यार्थिनीचं आतडं पूर्णपणे खराब झालं होतं आणि त्यांना छिद्र पडलं होतं. प्रकृती चिंताजनक असल्याने तिला दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, जिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
अहाना (१६) ही अमरोहा शहरातील मोहल्ला अफगानान येथील रहिवासी असून शेतकरी मन्सूर खान यांची मुलगी होती. ती शहरातील हाशमी गर्ल्स इंटर कॉलेजमध्ये अकरावीत शिकत होती आणि कुटुंबातील सर्वात लहान मुलगी होती. तिच्या पश्चात आई सारा खान, एक भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, अहानाला फास्ट फूड खाण्याचं व्यसनच जडलं होतं. घरच्यांनी वारंवार मनाई करूनही ती लपून-छपून चाऊमीन, मॅगी, पिझ्झा आणि बर्गर खात असे. सप्टेंबर महिन्यापासून तिची तब्येत बिघडण्यास सुरुवात झाली आणि तिच्या पोटात सतत तीव्र वेदना होऊ लागल्या.
फास्ट फूडमुळे गमावला जीव
३० नोव्हेंबर रोजी कुटुंबीयांनी तिला मुरादाबाद येथील एका खासगी रुग्णालयात नेलं. तिथे तपासणीअंती धक्कादायक माहिती समोर आली की, तिची आतडी एकमेकांना चिकटली असून त्यांना अनेक ठिकाणी छिद्रे पडली आहेत. डॉक्टरांनी या परिस्थितीचं मुख्य कारण 'सतत केलेले फास्ट फूडचे सेवन' हेच असल्याचं सांगितलं. त्यानंतर तिच्यावर सर्जरी करण्यात आली, जी यशस्वी झाली होती. साधारण १० दिवसांनंतर तिला रुग्णालयातून सुटी देण्यात आली, मात्र तिच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा झाली नाही. चार दिवसांपूर्वी प्रकृती पुन्हा खालावल्याने नातेवाईकांनी तिला तातडीने दिल्ली एम्समध्ये हलवलं.
डॉक्टरांनी दिला इशारा
नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, एम्समध्ये उपचारादरम्यान तिच्या प्रकृतीत काही प्रमाणात सुधारणा झाली होती आणि ती चालू-फिरू लागली होती. मात्र, रविवारी रात्री अचानक तिची प्रकृती बिघडली आणि हॉर्ट फेल झाल्याने तिचा मृत्यू झाला. अहानाचा मामा गुलजार खान यांनी सांगितलं की, डॉक्टरांनी फास्ट फूडलाच आतड्यांच्या या गंभीर अवस्थेसाठी जबाबदार धरलं आहे. एका हुशार विद्यार्थिनीच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.