१०८ विद्यमान भाजप खासदारांचा पत्ता कट ? 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 12:59 PM2019-03-12T12:59:43+5:302019-03-12T13:02:57+5:30

यंदाच्या निवडणुकीत भाजपकडून मोठ्या प्रमाणात विद्यमान खासदारांचा पत्ता कट करण्यात येणार असल्याची माहिती आहे

108 sitting BJP mp's may be loose ticket as per survey reports | १०८ विद्यमान भाजप खासदारांचा पत्ता कट ? 

१०८ विद्यमान भाजप खासदारांचा पत्ता कट ? 

Next

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर राजकीय पक्षांच्या उमेदवार निवड प्रक्रियेला जोर आला असून सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांची यादी तयार करण्यासाठी कंबर कसली आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपकडून मोठ्या प्रमाणात विद्यमान खासदारांचा पत्ता कट करण्यात येणार असल्याची माहिती आहे. भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप ४० टक्के नवीन चेहरे रिंगणात उतरवणार असल्याची माहिती दिली.  

येत्या दोन-तीन दिवसात भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील ९१ उमेदवारांची यादी अंतिम केली जाणार आहे. ११ एप्रिलला लोकसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्यासाठी मतदान पार पडणार आहे.  भाजपच्या प्रत्येक उमेदवाराला निवडणूक प्रचारासाठी किमान १ महिन्याचा कालावधी दिला जावा यासाठी पक्षाचे नेते प्रयत्न करत आहे. 

एअर स्ट्राइकनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत भर पडली असली तरी पक्ष कोणताही धोका पत्करण्यासाठी तयार नाही. त्यासाठी भाजपाकडून काही विद्यमान खासदारांना कात्रजचा घाट दाखविण्याची शक्यता आहे. ज्या विद्यमान खासदारांविरोधात मतदारसंघात नाराजी आहे अशांना पक्षाकडून उमेदवारी नाकारली जाणार आहे.  २०१४ च्या मोदी लाटेत अनेक खासदार असे निवडून आले होते ज्यांना पक्षाने ओळख निर्माण करून दिली मात्र या विद्यमान खासदारांनी स्वतः च्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष केले. या खासदारांविरोधात जनमानसात नाराजी आहे.  

देशातील 28 राज्यांपैकी 12 राज्यांमध्ये भाजपाची आणि 6 राज्यांमध्ये भाजप आणि आघाडी पक्षांची सत्ता आहे. यातील काही राज्यात भाजपविरोधी वातावरणाचा फटका भाजपला बसू शकतो. त्यामुळे या राज्यांमध्ये ज्या विद्यमान खासदारांविरोधात नाराजी आहे अशांना तिकीट न देण्याचा निर्णय पक्षनेतृत्त्वाने घेतला आहे. 

भारतीय जनता पार्टी, संघ आणि खाजगी संस्थांनी केलेल्या सर्व्हेक्षणात विद्यमान 272 खासदारांच्या मतदारसंघाचा आढावा घेतला गेला. यामध्ये प्रत्येक मतदारसंघातील विद्यमान आमदार, माजी आमदार, माजी खासदार, जिल्हा अध्यक्ष, जिल्हा संघटन मंत्री आणि राज्य संघटन मंत्री यांच्याकडून मते जाणून घेतली. तर खाजगी संस्थांकडून विद्यमान खासदारांच्या कामाचा आढावा, संभाव्य उमेदवार यांच्याबाबतचा सर्व्हे करण्यात आला. यामध्ये निम्म्याहून अधिक खासदारांच्या कामाबाबत जनता असंतुष्ट असल्याचा निदर्शनास आले.  

काही खासदारांचे मतदारसंघ बदलण्याचे संकेत 
भाजपाच्या सुत्रानुसार काही खासदारांचे मतदार संघ बदलले जाऊ शकतात तर अनेक ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. 

Web Title: 108 sitting BJP mp's may be loose ticket as per survey reports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.