जगातील ८६ देशांतील तुरुगांत १०,१५२ भारतीय कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 12:38 IST2025-04-11T12:38:07+5:302025-04-11T12:38:35+5:30
३१ देशांसोबत द्विपक्षीय करार होऊनही गेल्या तीन वर्षांत केवळ आठ जणांना परत आणण्यात यश आले.

जगातील ८६ देशांतील तुरुगांत १०,१५२ भारतीय कैद
चंद्रशेखर बर्वे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : पाकिस्तानने आपल्या तुरुंगात डांबून ठेवलेले नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यासह परदेशातील तुरुंगांत १०,१५२ भारतीय कैद असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. मात्र, ३१ देशांसोबत द्विपक्षीय करार होऊनही गेल्या तीन वर्षांत केवळ आठ जणांना परत आणण्यात यश आले.
परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंग यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील ८६ देशांच्या तुरुंगांत १०,१५२ भारतीय अडकून कैद आहेत. यात सर्वात जास्त ६,७४४ भारतीय मुस्लीम देशांतील तुरुंगांत अडकले आहेत. यात सौदी अरेबिया (२,६३३), यूएई (२,५१८), कतार (६११), कुवैत (३८७), मलेशिया (३३८), पाकिस्तान (२६६), ओमान (१४८) आणि बहरीन (१८१) या देशांचा समावेश आहे.
शंभरपेक्षा जास्त भारतीय असलेल्या देशांत नेपाळ (१,३१७), ब्रिटन (२८८), चीन (१७३), अमेरिका (१६९) आणि इटली (१६८)चा समावेश आहे. अर्जेंटिना, बेल्जिअम, चिली, डेन्मार्क, इजिप्त, इराक, जमैका, लिथुनिया, मलावी, माली, मेक्सिको, स्वीत्झर्लंड, ताजिकिस्तान, त्रिनिदाद आणि टोबॅगो, झिम्बाब्वे या देशांतील तुरुंगांत प्रत्येकी एक-एक भारतीय आहे.