१० वर्षांचे मूल पदरात, १ कोटींचे कर्ज काढून अमेरिकेत; १ महिन्यात परतले भारतात, स्वप्न भंगले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 20:42 IST2025-02-06T20:42:18+5:302025-02-06T20:42:43+5:30
Indian Immigrants: अमेरिकेत पतीची भेटही झाली नाही. १ कोटीची रक्कमही गेली, मुलाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्नही एका महिन्यात उद्ध्वस्त झाले. अमेरिकेपर्यंत पोहोचण्याची हकीकत आणि आपबीती अनेकांनी कथन केली आहे.

१० वर्षांचे मूल पदरात, १ कोटींचे कर्ज काढून अमेरिकेत; १ महिन्यात परतले भारतात, स्वप्न भंगले
Indian Immigrants: अमेरिकेने अवैध प्रवाशांविरुद्धच्या धोरणा अंतर्गत १०४ अवैध भारतीय स्थलांतरितांना जबरदस्तीने त्यांच्या देशातून हाकलून दिले. त्यांना घेऊन जाणारे अमेरिकन हवाई दलाचे विमान सी-१७ ग्लोबमास्टर २ वाजता अमृतसर येथील हवाई दलाच्या हवाई तळावर उतरले. या १०४ लोकांत त्यांची काही कुटुंबे आणि ८-१० वर्षे वयोगटातील मुलांचाही समावेश होता. अमेरिकेतील अवैध प्रवाशांना देशाबाहेर काढण्यासाठी कठोर कारवाईचे आश्वासन ट्रम्प यांनी निवडणुकीवेळी दिले होते. राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताच त्यांनी यासंबंधीच्या आदेशावर स्वाक्षरी केली. त्यानुसार ही कारवाई सुरू झाली आहे. भारतात परत आलेल्या काही लोकांच्या कहाण्या समोर येत आहेत.
अमेरिकन हवाई दलाचे विमान सुमारे साडेतीन तासांनंतर परतले. त्यानंतर पंजाबमधील लोकांना पोलिसांच्या वाहनांमधून त्यांच्या घरी पाठवण्यात आले. यामध्ये हरयाणा, गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि चंडीगडमधील लोकांचा समावेश आहे. अमेरिकन नौदलाचे तळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘ग्वांतानामो बे’मध्ये अवैध प्रवाशांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अवैध प्रवाशांना ठेवण्यासाठी ही सर्वांत योग्य जागा असून, येथे किमान ३० हजार लोकांना ठेवता येऊ शकते. आकडेवारीनुसार १९ हजार बेकायदेशीर भारतीयांना हद्दपार केले जाईल.
१० वर्षांचे मूल पदरात, १ कोटींचे कर्ज काढून अमेरिकेत
अवैध पद्धतीने अमेरिकेत गेलेल्या आणि तेथून परत भारतात परत आलेल्या अनेकांच्या कहाण्या आता समोर येत आहेत. काही माध्यमांनी याबाबतची वृत्ते दिली आहेत. २ जानेवारी रोजी लवप्रीत कौर यांनी आपल्या १० वर्षाच्या लहान मुलासह पंजाबहून युनायटेड स्टेट्सचा प्रवास सुरू केला. अमेरिकेत पोहोचण्यासाठी लवप्रीत कौर यांनी एजंटला जवळपास १ कोटी रुपये दिले होते. आम्हाला अमेरिकेत पोहचण्यासाठी डंकी मार्गाद्वारे अनेक देशांतून प्रवास करावा लागला. एजंटने आम्हाला सांगितले होते की, तो आम्हाला थेट अमेरिकेत घेऊन जाईल. परंतु, आम्हाला खूपच अनपेक्षित अनुभव आला. लवप्रीत कौर यांना हे सांगताना अश्रू अनावर झाले.
कसे पोहोचले अमेरिकेत, कसा होता मार्ग?
आम्ही आधी कोलंबियाच्या मेडेलिन येथे विमानाने नेण्यात आले. तिथे आम्ही दोन आठवडे मुक्काम केला. नंतर पुन्हा विमानाने सॅन साल्वाडोर येथे नेण्यात आले. तिथून आम्ही ३ तासांहून अधिक काळ चालत चालत ग्वाटेमलाला गेलो. तिथून टॅक्सीने मेक्सिकन सीमेवर पोहोचलो. मेक्सिकोत२ दिवस राहिल्यानंतर अखेर २७ जानेवारी रोजी आम्ही अमेरिकेत पोहोचलो, असे लवप्रीत कौर यांनी सांगितले. अमेरिकेची सीमा ओलांडताच अमेरिकन अधिकाऱ्यांनी लवप्रीत कौर आणि त्यांच्याबरोबर असलेल्या लोकांना ताब्यात घेतले.
आमच्या हातापायाला साखळदंड बांधले, फक्त मुलांना मोकळे सोडले
अमेरिकेत पोहोचल्यानंतर त्या लोकांनी आमचे सीम कार्ड फेकून देण्यास सांगितले. तसेच कानातील आणि हातात घातलेल्या बांगड्या काढण्यास सांगितल्या. माझे सामान आधीच्या देशात हरवले होते. त्यामुळे माझ्याकडे त्यांना देण्यासाठी काहीच नव्हते. आम्हाला ५ दिवस एका शिबिरात ठेवले गेले. त्यानंतर २ फेब्रुवारी रोजी आमच्या कमरेपासून पायाला आणि हाताला साखळदंड बांधले गेले. फक्त मुलांना मोकळे सोडले गेले, अशी आपबीती लवप्रीत कौर यांनी कथन केली. तसेच एजंटने आम्हाला सांगितले होते की, ते कॅलिफोर्नियातील आमच्या नातेवाईकांकडे आम्हाला पोहोचवतील. पण आमची सर्व स्वप्न आता धुळीस मिळाली आहेत. सरकारने या एजंटवर कारवाई करून आमचे पैसे परत मिळवून द्यावेत, अशी मागणी लवप्रीत कौर यांनी केली आहे.
दरम्यान, लवप्रीत कौर यांचे वय ३० वर्षे आहे. पतीला भेटण्यासाठी त्या १० वर्षांच्या मुलाला घेऊन अमेरिकेत गेल्या होत्या. परंतु, पतीला न भेटताच भारतात परतावे लागले. अमेरिकेत गेल्यानंतर मुलाचे भविष्य उज्ज्वल होईल, अशी आशा बाळगून लवप्रीत कौरच्या कुटुंबियांनी कर्ज काढून १ कोटींची रक्कम गोळा केली होती. परंतु, १ कोटीची रक्कमही गेली, मुलाच्या उज्ज्व भविष्याचे स्वप्नही एका महिन्यात उद्ध्वस्त झाले.