जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत दररोज १ कोटी लसींचे डोस उपलब्ध होणार : ICMR
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 21:58 IST2021-06-01T21:56:10+5:302021-06-01T21:58:47+5:30
देशात सध्या दर महिन्याला ८.५ कोटी लसींच्या डोसचं उत्पादन. डिसेंबर महिन्यापर्यंत संपूर्ण देशवासींचं लसीकरण होण्याची अपेक्षा, केंद्रानं यापूर्वी दिली होती माहिती.

जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत दररोज १ कोटी लसींचे डोस उपलब्ध होणार : ICMR
देशात कोरोनाच्या महासाथीमुळे हाहाकार माजला होता. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण हा पर्याय असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. दरम्यान जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातील देशात दररोज १ कोटी लसींचे डोस (Coronavirus Vaccine) उपलब्ध होतील असं मत इंडियन मेडिकल काऊन्सिल ऑफ रिसर्चचे (ICMR) प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांनी व्यक्त केलं. भार्गव यांचं हे वक्तव्य अशावेळी आलं जेव्हा सरकार लसीकरणाचं आपलं ध्येय दुप्पट करण्याच्या विचारात आहे. या वर्षाच्या अखेरिस १०८ कोटी लोकांचं लसीकरण करण्याचं लक्ष्य सरकारनं ठेवलं आहे. सध्या देशात असलेल्या कंपन्यादेखील उत्पादन वाढवत आहेत. तर दुसरीकडे अनेक परदेशी कंपन्यादेखील आता यामध्ये उतरताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत भविष्यात लसींची कमतरता जाणवणार नाही असं भार्गव म्हणाले.
"चाचण्यांची संख्या वाढवल्यामुळे आणि कंन्टेन्मेंट झोनवर कठोर निर्बंध आणल्यामुळे दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवता आलं आहे. परंतु हा स्थायी उपाय मानणं योग्य नाही. लसींची कोणतीही कमतरता नाही. जेव्हा तुम्हाला केवळ एका महिन्याभरात लसीकरण करून घ्यायचं असेल तेव्हाच तुम्हाला त्याची कमतरता जाणवेल. आपली लोकसंख्या अमेरिकेच्या तुलनेत चारपट आहे. अशा परिस्थितीत आपल्याला धैर्य बाळगायला हवं," असंही डॉ. भार्गव म्हणाले. "डिसेंबर महिन्यापर्यंत संपूर्ण देशात लसीकरण पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. केंद्रानं सोमवारी सर्वोच्च न्यायालयाला ही बाब सांगितली आहे," असंही ते म्हणाले.
देशात सध्या दर महिन्याला ८.५ कोटी लसींच्या डोसचं (२८.३३ लाख डोस रोज) उत्पादन होत असल्याची माहिती गेल्या आठवड्यात केंद्र सरकारनं केरळ उच्च न्यायालयाला दिली. तसंच जुलै महिन्यापासून हे उत्पादन वाढण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी नमूद केलं होतं. सध्या देशात कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि स्पुटनिक व्ही या लसी उपलब्ध आहेत.