युवकावर प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 16:47 IST2018-06-14T16:47:19+5:302018-06-14T16:47:19+5:30
संशयीतांनी त्यास लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करीत त्याच्या डोक्यात चाकूने वार करून पोबारा केला.

युवकावर प्राणघातक हल्ला
नाशिक : दुकान बंद करण्यास लावणाऱ्या दुचाकीस्वार त्रिकुटास जाब विचारल्याने एकावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना गंगापूररोडवर घडली. या घटनेत युवकाच्या डोक्यात चाकूने वार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल देविदास गांगुर्डे (३३ रा.गुलमोहर कॉलनी) या युवकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. अमोल गांगुर्डे रविवारी (दि.१०) रात्री गंगापूररोडवरील वाईनशॉप समोर उभा असतांना ही घटना घडली. रात्री दहाच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या अज्ञात तीघांनी आपल्या वाहनावरूनच वाईन शॉप बंद करण्याचे फर्मान सोडले. यावेळी गांगुर्डे यांनी का दुकान बंद करण्यास लावतात असे विचारले असता संशयीतांनी त्यास लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करीत त्याच्या डोक्यात चाकूने वार करून पोबारा केला. या घटनेत गांगुर्डे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिक तपास जमादार धात्रक करीत आहेत.