बिबट्याच्या हल्ल्यामध्ये युवतीचा मृत्यू; अभ्यासात हुशार पायलच्या दुर्दैवी मृत्यूने हळहळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 15:50 IST2025-04-26T15:49:49+5:302025-04-26T15:50:16+5:30
हल्ल्यात गंभीर जखमी पायलला दिंडोरी रुग्णालयात दाखल केले असता तिचा मृत्यू झाला.

बिबट्याच्या हल्ल्यामध्ये युवतीचा मृत्यू; अभ्यासात हुशार पायलच्या दुर्दैवी मृत्यूने हळहळ
Nashik Leopard Attack: दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी शिवारात चारा कापण्यासाठी गेलेल्या २० वर्षीय युवतीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. पायल राजेंद्र चव्हाण असे मृत युवतीचे नाव आहे. नाशिक कळवण रस्त्याजवळ वाघाड़ कॅनॉललगत राजेंद्र चव्हाण यांच्या वस्तीवर त्यांची मुलगी पायल गुरांना चारा कापण्यासाठी गेली असता बिबट्याने तिच्यावर हल्ला केला.
नातेवाईकांनी तातडीने धाव घेत बिबट्याला पिटाळून लावले. मात्र हल्ल्यात गंभीर जखमी पायलला दिंडोरी रुग्णालयात दाखल केले असता तिचा मृत्यू झाला. पायल चव्हाण ही मविप्र महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकत होती. अभ्यासात हुशार पायलच्या दुर्दैवी मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.
परिसरात सातत्याने बिबट्याचे दर्शन होत असून जनावरांवर हल्ले होत आहेत. काही महिन्यापूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात गुराखी मुलाचा हल्ल्यात मृत्यू झाला होता. मात्र वनविभाग उपाययोजना करत नसल्याचा आरोप ग्रामस्थ्यांनी केला आहे.