चुकला काळजाचा ठोका!
By Admin | Updated: July 31, 2016 00:33 IST2016-07-31T00:26:18+5:302016-07-31T00:33:21+5:30
आदिरंग महोत्सव : निरनिराळ्या राज्यांतील कलावंतांच्या नृत्याविष्काराने नाशिककर थक्क

चुकला काळजाचा ठोका!
नाशिक : हातातल्या तळपत्या तलवारी एकमेकांवर त्वेषाने आदळणाऱ्या मणिपुरी युद्धपटूंचे नृत्य पाहून नाशिककरांच्या काळजाचा अक्षरश: ठोका चुकला. देशाच्या निरनिराळ्या प्रांतांतील एकाहून एक मनोहारी नृत्याविष्कार पाहून रसिक थक्क झाले अन् खच्चून भरलेल्या सभागृहातील प्रत्येकाने टाळ्यांची दाद दिली.
नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा (एनएसडी) व नाशिक महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने गायकवाड सभागृहात सुरू असलेल्या आदिरंग महोत्सवाचा दुसरा दिवस निरनिराळ्या राज्यांतील कलावंतांनी वैविध्यपूर्ण नृत्यांनी गाजवला. कार्यक्रमाचा प्रारंभ महाराष्ट्राच्या बंजारा नृत्याने झाला. राजस्थानातून स्थलांतरित बंजारा बांधवांचे हे नृत्य आकर्षक वेशभूषेमुळे रसिकांना भावले. त्यानंतर दार्जिलिंग येथील गोरथा आदिवासींचे गोरथा लिंबू नृत्य रंगले. नवीन घरात प्रवेश करताना वाघाच्या कातड्याचे ढोल बडवून आनंद व्यक्त करतानाच्या या नृत्यातील कलावंतांच्या पायाच्या लयबद्ध हालचाली रसिकांच्या दाद घेऊन गेल्या.
मध्य प्रदेशातील गोंड आदिवासी जमातीत बकासुराला प्रसन्न करण्यासाठी केला जाणारा सेला कर्मा हा नृत्याविष्कार सादर झाला. विविधरंगी फेटे परिधान करून हातात मोरपिस नाचवणाऱ्या या कलावंतांनी रसिकांना ठेका धरायला भाग पाडले. मुलाबाळांच्या सुरक्षेसाठी आसाममधील बोडो जमातीच्या महिलांकडून होणारे ढाल-ठुमरी नृत्यही उपस्थितांना चांगलेच भावले. हातात ढाल व तलवार घेऊन महिला कलावंतांनी रणरागिणी अवतार सादर केला.
बंगालमधील संथाल जमातीत विवाहाच्या वेळी केल्या जाणाऱ्या संथाली नृत्याने रसिकांना चांगलेच रिझवले. केरळमध्ये कार्तिकेयाच्या उपासनेसाठी कावडीला मोरपंख लावून केल्या जाणाऱ्या कावडी नृत्यालाही उपस्थितांनी दाद दिली.