इगतपुरी रेल्वेस्थानकात झाली महिलेची सुखरुप प्रसुती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 00:10 IST2020-07-26T21:23:15+5:302020-07-27T00:10:06+5:30
नाशिकरोड : मुंबई वाराणसी विशेष प्रवासी रेल्वेमध्ये प्रवासी असलेल्या गरोदर महिलेला प्रसुुतीच्या वेदना होऊ लागल्याने इगतपुरी रेल्वे स्थानकात रेल्वेचे अधिकारी, वैद्यकीय पथकाने धावपळ करीत प्रवासी महिलेची सुखरुप प्रसुती केली.

इगतपुरी रेल्वेस्थानकात झाली महिलेची सुखरुप प्रसुती
नाशिकरोड : मुंबई वाराणसी विशेष प्रवासी रेल्वेमध्ये प्रवासी असलेल्या गरोदर महिलेला प्रसुुतीच्या वेदना होऊ लागल्याने इगतपुरी रेल्वे स्थानकात रेल्वेचे अधिकारी, वैद्यकीय पथकाने धावपळ करीत प्रवासी महिलेची सुखरुप प्रसुती केली.
मुंबई-वाराणसी विशेष प्रवासी रेल्वेगाडी रविवारी (दि.२६) पहाटे सव्वातीनच्या सुमारास इगतपुरीला येणार होती. रेल्वेमध्ये प्रियंका नावाची गरोदर महिला प्रवास करत होती. इगतपुरी येण्याअगोदरच तीला अचानक प्रसुती वेदना होऊ लागल्या. नातेवाईक व सहप्रवाशांनी रेल्वेतील कर्मचाऱ्यांशी तातडीने संपर्क साधून गरोदर महिलेला प्रसूतीच्या वेदना होत असल्याची माहिती सांगत मदत मागितली.
इगतपुरी रेल्वेस्थानकाचे उपव्यवस्थापक अवधेश कुमार यांनी रेल्वे आरोग्य केंद्राला सूचना केल्या. अतिरिक्त विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योत्स्ना आणि त्यांचे सहकारी यांनी लागलीच पूर्व तयारी केली. गरोदर प्रियंका व तिच्या नातेवाईकांना रेल्वे प्रशासनाकडून इगतपुरी रेल्वेस्थानकावर उतरण्याबाबत सूचना केली. मुंबई वाराणसी विशेष प्रवासी रेल्वे इगतपुरी रेल्वे स्थानकावर येतात प्रियंका व तिचे नातेवाईक हे रेल्वेतून उतरले लागलीच रेल्वेच्या वैद्यकीय पथकाच्या मदतीने रेल्वे स्थानकावरच प्रियंकाची प्रस्तुती करण्यात आली. नवजात बाळ आणि प्रियंका या दोघांची प्रकृती उत्तम आहे. खबरदारी म्हणून दोघांना प्रसूती पश्चात उपचारासाठी अॅम्बुलन्समधून इगतपुरीच्या ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. तेथे तिच्यावर पुढील उपचार सुरु आहेत.