Woman burnt to death for not paying rent | घरभाडे न दिल्याने महिलेची जाळून हत्या

घरभाडे न दिल्याने महिलेची जाळून हत्या

ठळक मुद्देभारतनगर येथील प्रकार : चार जणांवर गुन्हा दाखल; दोघांना अटक

नाशिक : शहरातील भारतनगर भागात घरभाड्याचा तगादा लावत घरमालकाने थेट भाडेकरू महिलेला अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार पीडित महिलेच्या मृत्युपूर्वी दिलेल्या जबाबाने गुरुवारी (दि.२) समोर आला. याप्रकरणी मुंबईनाका पोलिसांनी घरमालकासह त्याच्या संशयित साथीदारांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. लॉकडाऊनमुळे आधीच गोरगरिबांच्या रोजीरोटीवर गंडांतर आले आहे. त्यामुळे शासनाने घरभाडे वसुलीला मनाई केली असताना हा प्रकार घडला आहे, हे विशेष होय.
वडाळारोडवरील भारतनगर भागात राहणाऱ्या आयेशा असीम शेख (वय १८) या महिलेला भाजलेल्या गंभीर अवस्थेत मंगळवारी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान, बुधवारी (दि.१) आयेशाचा मृत्यू झाला. तत्पूर्वी कार्यकारी दंडाधिकारी हेमंत पोटिंदे यांनी महिलेचा जबाब घेतला. जबाबानुसार मंगळवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास संशयित बब्बू (पूर्ण नाव नाही), अश्पाक शेख (३२, रा. शिवाजीवाडी), राणी व अमन (पूर्ण नावे नाहीत) यांनी घरभाडे दिले नाही म्हणून रॉकेल ओतून पेटवून दिले, असे म्हटले आहे. या जबाबानुसार मुंबईनाका पोलीस ठाण्यात घरमालकासह चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच पोलिसांनी संशयित अश्पाक व शाहिस्ता उर्फ राणी शेख या दोघांना अटक केली आहे. न्यायालयाने
शुक्र वारपर्यंत (दि.३) पोलीस कोठडी सुनावली आहे.
पतीचा मात्र वेगळाच जबाब
पोलीस तपासात परिस्थितीजन्य पुरावे, साक्षीदार आणि मयत महिलेच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार आयेशाने स्वत:च अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्याचे समोर येत आहे.
४घटनेच्या दिवशी महिलेचे तिच्या पतीसोबत वाद झाले. त्यावेळी घरमालक तेथे आला, त्याचवेळी तिने स्वत:स पेटवून घेतल्याचे प्राथमिक अंदाज असल्याचे पोलीस सूत्रांनी
सांगितले.
खुनाचा गुन्हा; मात्र साशंकता कायम
मृत्युपूर्व जबाबात घरभाड्याचा तगादा लावत घरमालकाने पेटविल्याचे सांगितल्याने पोलिसांनी सुरुवातीला संशयितांविरुद्ध जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला; मात्र बुधवारी जळीत महिलेचाच मृत्यू झाल्याने या गुन्ह्याचे रूपांतर खुनाच्या गुन्ह्यात करण्यात आले; मात्र अद्यापही पोलिसांसमोर महिलेचा मृत्यू की आत्महत्या याबाबतचा पेच कायम आहे.

Web Title: Woman burnt to death for not paying rent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.