टेबलखालील शिक्षकांचाही शोध घेतला जाईल काय ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:18 IST2021-08-15T04:18:07+5:302021-08-15T04:18:07+5:30
डॉ. वैशाली झनकर यांच्या लाच प्रकरणाने शिक्षण क्षेत्राला बदनामीचा कलंक लागला हे नाकारता येणारे नाही. हा कलंक पुसण्यासाठी शिक्षण ...

टेबलखालील शिक्षकांचाही शोध घेतला जाईल काय ?
डॉ. वैशाली झनकर यांच्या लाच प्रकरणाने शिक्षण क्षेत्राला बदनामीचा कलंक लागला हे नाकारता येणारे नाही. हा कलंक पुसण्यासाठी शिक्षण विभागाला आता काही कठोर पावले उचलावी लागणार आहेत. यापूर्वीही वेगवेगळ्या पदावरील अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याची उदाहरणे आहेत. परंतु, अधिकाऱ्यांवर कारवाईनंतर त्यांना पुन्हा समकक्ष पदस्थापना मिळाल्याने शिक्षण विभागातील अधिकारी आणखीनच निडर झाले आहेत. त्यामुळे राजरोजपणे लाखोंची रक्कम स्वीकारण्यापर्यंत अधिकारी आणि त्यांच्या साथीदारांची मजल गेली हे नाकारता येणार नाही. या भ्रष्टाचारी वृत्तीला वेळीच लगाम लावण्याचे आव्हान शिक्षण विभागाला पेलावे लागणार आहे. या भ्रष्टाचाराची सुरुवात पात्रताधारकांच्या बेरोजगारीमुळे संस्थास्तरावरूनच सुरू होते. सुरुवातीला पात्रताधारकांकडून मानधनावर अथवा सेवाभावातून काम करून घेत मोठी रक्कम स्वीकारून शिक्षण संस्थांकडून शिक्षकांना रुजू करून घेतले जाते. त्यानंतरही वेतनमान्यता मिळविण्यासाठी संबंधित शिक्षकांना अशाप्रकारे मोठ्या रकमांची लाच द्यावी लागते. लाचखोरीला बळी पडणारे हे शिक्षक भविष्यातील प्रामाणिक पिढी घडवू शकतील का ? याविषयी शिक्षण विभागाने आत्मचिंतन करण्याची ही वेळ आहे. म्हणूनच वैशाली झनकर यांनी अशाप्रकारे आणखी किती शिक्षकांना अथवा शाळांना मान्यता दिल्या आहेत. त्यांना शोधून त्यांच्यावरही कारवाई करीत शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीकोनातून पाऊल उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.
संघटनांमधील त्या दलालांचे काय?
शिक्षण विभागात लाचखोरी बोकाळण्यास दलाली करणारे काही शिक्षक पुढारीही कारणीभूत असल्याचा सूर आता विविध शिक्षक संघटनांमधूनही उमटू लागला आहे. अशा दलालांवर काय कारवाई होणार ? याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष आहे. तसेच लाचखोर शिक्षणाधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबतच असे शिक्षकही शोधून त्यांच्यावरही कारवाई करतानाच त्यांच्या मालमत्तांची, आणि कार्यभाराचीही चौकशीची अपेक्षा व्यक्त होत आहे.
- नामदेव भोर