मनसेचे मिशन महापालिका यंदा होईल का फत्ते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:18 IST2021-08-15T04:18:03+5:302021-08-15T04:18:03+5:30

मनसेच्या सत्ताकाळात खूप कामे झाली. राज ठाकरे यांनी उद्योगपती रतन टाटा, रिलायन्स फाउंडेशन अशा अनेक कंपन्यांकडून निधी आणला आणि ...

Will MNS's mission be successful this year? | मनसेचे मिशन महापालिका यंदा होईल का फत्ते?

मनसेचे मिशन महापालिका यंदा होईल का फत्ते?

मनसेच्या सत्ताकाळात खूप कामे झाली. राज ठाकरे यांनी उद्योगपती रतन टाटा, रिलायन्स फाउंडेशन अशा अनेक कंपन्यांकडून निधी आणला आणि नाशिकचे कॉस्मेटिक चेंजदेखील केले. मात्र, आम्ही केलेले काम लोकापर्यंत पोहोचवू शकलो नाहीत असे राज ठाकरे यांनी मान्य केले. त्यामुळे नव्याने उभारी घेऊन मनसेने नाशिककरांमध्ये पुन्हा एकदा विश्वास निर्माण करण्याची तयारी सुरू केली आहे.

शिवसेना सोडल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना करताना राज ठाकरे नाशकात आले होते. त्यांनी त्यांच्या नाशकातील समर्थकांनादेखील साद घातली होती. मनसे स्थापन झाल्यानंतर नाशिकमध्ये झालेली आंदोलने तसेच मुलांच्या करिअरविषयक उपक्रमांमुळे मनसे घराघरांत पाेहोचली. प्रस्थापित पक्षांना नवा पर्याय सापडल्याने अगदी शाळकरी मुलांमध्येदेखील आकर्षण होते. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे नाशिक शहरात चारपैकी तीन आमदार निवडून आले. इतके घवघवीत यश मिळवल्यानंतर २०१२ मध्ये महापालिकेच्या निवडणुकीत मनसेचे तब्बल चाळीस नगरसेवक निवडून आले. खरे तर बहुमताचा आकडा मनसेला गाठता आला नाही, मात्र सर्वाधिक नगरसेवक मनसेचे निवडून आल्याने या पक्षाला संधी मिळाली. भाजपने साथ दिली. या पक्षाचे १४ नगरसेवक मिळाल्याने बहुमताचा जादुई आकडा मनसेला गाठता आला आणि ॲड. यतीन वाघ हे मनसेचे पहिले महापौर बनले. त्यांची अडीच वर्षे संपत असतानाच बऱ्याच राजकीय घडामोडी झाल्या. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युती असल्याने यतीन वाघ यांच्या नंतरच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने हात वर केले, मात्र त्यावेळी अपक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मनसेला साथ दिली आणि अशोक मुर्तडक हे महापौर म्हणून निवडले गेले. देशात आणि पाठोपाठ राज्यात भाजपची सत्ता आली. त्यामुळे राजकीय हवापालट झाला आणि मनसेला गळती लागली. मनसेचे चाळीसवरून शेवटी आठ ते नऊ नगरसेवक शिल्लक राहिले. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत मनसेचे पानिपत झाले आणि चाळीसवरून अवघे पाच नगरसेवक निवडून आले.

इन्फो...

२००७ - १२

२०१२- ४०

२०१७- ५

इन्फो...

मनसेची एकला चलो रे भूमिका

राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केल्यानंतर आत्तापर्यंत एकला चलो रे भूमिका घेतली आहे. कोणत्याही निवडणुकीपूर्वी त्यांनी युती केलेली नाही. निवडणुकीनंतर मात्र कोणत्याही पक्षाशी युती करणे या पक्षाला गैर वाटलेले नाही. त्यामुळे हा पक्ष निवडणूकपूर्व कोणत्या पक्षाशी युती करण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.

Web Title: Will MNS's mission be successful this year?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.