Nashik Crime: नाशिकच्या निफाड तालुक्यातील उगाव येथील एका तरुणाच्या गूढ मृत्यूचा पोलिसांनी छडा लावला असून, यातून धक्कादायक खुलासा झाला आहे. बेपत्ता झालेल्या ३० वर्षीय शादाब तांबोळीची हत्या दुसरं कोणी नसून त्याच्या स्वतःच्या पत्नीनेच प्रियकर आणि भावाच्या मदतीने केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. केवळ प्रेमात अडथळा ठरत असल्याच्या रागातून शादाबचा काटा काढण्यात आला.
१८ फेब्रुवारीपासून सुरू झाला मृत्यूचा खेळ
निफाड येथील रहिवासी असलेला शादाब तांबोळी हा १८ फेब्रुवारी रोजी घरातील सामान आणण्यासाठी बाहेर पडला होता. मात्र, तो घरी परतलाच नाही. घरच्यांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर तपास सुरू झाला. दरम्यान, २२ फेब्रुवारी रोजी चांदवडमधील परसूल नदीच्या पुलाखाली एका अज्ञात तरुणाचा मृतदेह तरंगताना आढळला. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला असता, एका क्रूर कृत्याचा पुरावा समोर आला. शादाबच्या तोंडाला, हातापायांना आणि कंबरेला लोखंडी वजनदार डंबेल्स बांधले होते, जेणेकरून त्याचा मृतदेह कधीच वर येऊ नये.
तपासाची चक्रे फिरली अन् पत्नी संशयाच्या भोवऱ्यात आली
मृतदेहाची ओळख पटल्यानंतर निफाड पोलिसांनी तांत्रिक तपासावर भर दिला. शादाबची पत्नी मुस्कान तांबोळी हिच्या हालचाली आणि कॉल डिटेल्स तपासले असता पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. मुस्कानचे मनमाड येथील ऋषभ वर्मा या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. या संबंधांची कुणकुण शादाबला लागली होती त्यामुळे त्यांच्यात वाद होत होते. याच वादाचा शेवट करण्यासाठी मुस्कानने आपल्या प्रियकरासह भावालाही या कटात ओढले.
पोल्ट्री फार्मवर 'असा' रचला खुनाचा कट
मुस्कानचा भाऊ शाहरूख शेख आणि प्रियकर ऋषभ यांनी शादाबला संपवण्यासाठी एक प्लॅन आखला. सोन्याच्या दागिन्यांच्या व्यवहाराचे आमिष दाखवून शादाबला मनमाड-मालेगाव रोडवरील एका बंद पडलेल्या पोल्ट्री फार्मवर बोलावण्यात आले. तिथे शादाबची निर्घृण हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी त्याच्या शरीराला लोखंडी वजनं बांधली आणि चांदवडच्या नदीत फेकून दिले.
सात आरोपी गजाआड
पोलिसांनी अत्यंत कौशल्याने सापळा रचून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्नी मुस्कानसह एकूण सात जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मुस्कान तांबोळी, ऋषभ मनोज वर्मा, शाहरूख शेख, युवराज थोरात, सलीम साबीर शेख, आर्यन सुंदर जिनवाल, शेख एजाज शेख रियाज यांचा समावेश आहे. या सर्वांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
Web Summary : Nashik: A woman, with her lover and brother, murdered her husband for being an obstacle to their affair. They dumped the body in a river with weights attached. Police arrested seven people involved in the crime.
Web Summary : नाशिक: एक महिला ने अपने प्रेमी और भाई के साथ मिलकर अपने पति की हत्या कर दी, क्योंकि वह उनके प्रेम संबंध में बाधा बन रहा था। उन्होंने शव को वजन बांधकर नदी में फेंक दिया। पुलिस ने इस अपराध में शामिल सात लोगों को गिरफ्तार किया।