काँग्रेस चिंतन शिबिरामुळे विकेट, शहराध्यक्षपदाचा आहेर यांचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2022 01:44 IST2022-06-02T01:44:09+5:302022-06-02T01:44:37+5:30
उदयपूर येथील चिंतन शिबिरात ठरल्यानुसार एक व्यक्ती एक पद या तत्त्वाची अंमलबजावणी करण्याचे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी करताच नाशिकचे शरद आहेर यांनी तब्बल आठ वर्षांपासून त्यांच्याकडे असलेल्या प्रभारी शहराध्यक्षपदाचा राजीनामा देऊन हे पद मोकळे केले आहे.

काँग्रेस चिंतन शिबिरामुळे विकेट, शहराध्यक्षपदाचा आहेर यांचा राजीनामा
नाशिक : उदयपूर येथील चिंतन शिबिरात ठरल्यानुसार एक व्यक्ती एक पद या तत्त्वाची अंमलबजावणी करण्याचे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी करताच नाशिकचे शरद आहेर यांनी तब्बल आठ वर्षांपासून त्यांच्याकडे असलेल्या प्रभारी शहराध्यक्षपदाचा राजीनामा देऊन हे पद मोकळे केले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अहमदनगर येथे आयोजित शिबिरात त्यांनी पद सोडले असून आता नवीन शहराध्यपदासाठी असलेल्या दावेदारांचा मार्ग मोकळा झाला आहे. अहमदनगर येथे काँग्रेसच्या निवडक तीनशे पदाधिकाऱ्यांचे शिबिर सुरू असून त्यावेळी आहेर यांनी राजीनामा दिला. नाशिक शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून छाजेड गट आणि विरेाधी गट यांच्यात वाद असल्याने अखेरीस आठ वर्षांपूर्वी ग्रामीण काँग्रेसचे काम करणारे शरद आहेर यांची प्रभारी शहराध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली. त्यानंतर काँग्रेसला नवीन शहराध्यक्ष नियुक्त करता आला नाही. केाणा एकाचे नाव निश्चीत होत आले की दुसरा गट पक्षश्रेेष्ठींना भेटून त्याच्या विरोधात तक्रारी करीत असल्याने तेच शरद आहेर यांच्या पथ्यावरही पडत असल्याने हा तिढा कधीच सुटला नाही आणि आठ वर्षे पक्षाला पूर्णवेळ शहराध्यक्षच मिळाला नाही.
गेल्या महापालिका निवडणुकीत पक्षाची कामगिरी अत्यंत सुमार झाली. अवघे सहा नगरसेवक निवडून आले. मात्र, त्यानंतरही पक्षाने शहराध्यक्ष बदलले नव्हते. उलट दीड वर्षापूर्वी आहेर यांना प्रदेश काँग्रेस कमिटीवर नियुक्त करण्यात आले. मात्र, आता उदयपूर येथील चिंतन शिबिरात एक व्यक्ती एक पद असा निर्णय झाला. त्यानंतर अहमदनगर येथे सुरू असलेल्या शिबिरात याचसंदर्भात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आवाहन केल्यानंतर आहेर यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेस पक्षात एकाच व्यक्तीकडे दोन किंवा अनेक पदे आहेत. तसेच एकाच घरात तीन-तीन पदेही आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष त्यावर काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे आहे.
कोट...
पक्षाने उदयपूर येथे घेतलेल्या निर्णयाचा आदर राखून मी शहराध्यक्षपदाचा राजीनामा स्वत: प्रदेशाध्यक्षांकडे दिला आहे. माझ्याकडे दोन पदांची जबाबदारी होती. आता शहराध्यक्षपदी नवीन युवा नेतृत्वाला संधी मिळावी अशी इच्छा आहे.
इन्फो...
काँग्रेस पक्षात शहराध्यक्षपदासाठी डॉ. शोभा बच्छाव, शाहू खैरे, डॉ. हेमलता पाटील, गुरुमित बग्गा, शैलेश कुटे, राहुल दिवे, बबलू खैरे, वसंत ठाकूर अशा अनेकांच्या नावांची चर्चा असून लवकरच याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.