कशासाठी.. पोटासाठी : अल्पभूधारक शेतकऱ्याची शोकांतिका
By Admin | Updated: July 23, 2016 22:51 IST2016-07-23T22:51:36+5:302016-07-23T22:51:36+5:30
वृद्ध शेतकरी दाम्पत्य ओढते नांगर

कशासाठी.. पोटासाठी : अल्पभूधारक शेतकऱ्याची शोकांतिका
नाशिक : ट्रॅक्टर किंवा बैलाच्या साह्याने शेत नांगरणी करणेही परवडत नसल्याने एक वृद्ध दाम्पत्य चक्क स्वत: नांगर ओढत आहे. पोटापाण्यासाठी शेतीत राबणारे हे वृद्ध दाम्पत्य गेल्या काही वर्षांपासून बैल आणि आधुनिक साधनांशिवाय शेती करीत आहेत. शेती करण्यासाठी त्यांच्याजवळ बैलच नसल्याने त्यांना स्वत:लाच नांगराला जुंपून घ्यावे लागले आहे, तर दुसरीकडे ट्रॅक्टरच्या साह्याने शेती करणेही आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्यामुळे टमाटे, भुईमूग यासारख्या पिकांसाठी या दाम्पत्याला शेतामध्ये बैलासारखे राबावे लागत आहे.
साधारणपणे साठीच्या पुढे वयोमान असलेले हे भिंगराज गोपाल पालवी आणि त्यांच्या पत्नी शकुंतला हे दाम्पत्य बैलाच्या जागी स्वत:ला जुंपून नांगर ओढत असल्याचे पाहून त्यांच्या कठोर कष्टाची आणि मेहनतीची जाणीव होते. नाशिकपासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावरील शिवनई गावच्या शिवारात हे अल्पभूधारक शेतकरी दाम्पत्य शेतात राबत आहे. कुठल्याही साधनांची अपेक्षा न करता झेपेल आणि जमेल तेव्हढे ते नांगर ओढतात. पोटापाण्यासाठी हे करावेच लागते, असे ते कळवळून सांगतात. त्यांना कोणत्या शासकीय मदतीची किंवा कुणाच्या सहकार्याचीदेखील अपेक्षा नाही. त्यांनी आजच्या शेतकऱ्यांची दशा समाजाला कळू द्या, अशी भावना व्यक्त केली.
आधुनिक पद्धतीच्या शेतीने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवल्याची आकडेवारी शासकीय पातळीवर दिली जात असली तरी अल्पभूधारक शेतकऱ्यांना मात्र अजूनही पारंपरिक पद्धतीनेच शेती करावी लागत असल्याचेच हे वास्तव आहे. शेतीची कामे आता आधुनिक पद्धतीने होऊ लागली आहेत. त्यामुळे बैलांचा वापर कमी झाला आहेच शिवाय दुष्काळी परिस्थितीमुळे बैलांचा सांभाळ करणेही कठीण झाल्यामुळे बैलांची संख्या कमी झाली आहे. या शेतकऱ्याकडे बैल नसल्यामुळे आणि दुसऱ्याचे बैल किंवा ट्रॅक्टर भाड्याने आणणेही परवडत नसल्यामुळे हे दाम्पत्य स्वत:च नांगर ओढत आहेत. भुईमुगाचे पीक घेण्यासाठी आजोबा नांगर ओढतात, तर त्यांच्या पत्नी या पाठीमागून नांगर घेऊन चालवतात.
पावसाच्या रिमझिम सरीत आणि मजल दर मजल करीत या दाम्पत्याने अर्ध्याहून अधिक शेत नांगरले आहे. भुईमुगाची लागवड करण्यासाठी भल्या पहाटे हे दाम्पत्य शेतावर येते आणि दिवसभर नांगर ओढत असते. या दाम्पत्याकडे पाहताना हे कुठल्या आदिवासी खेड्यापाड्यातील शेतकरी असावेत असेच वाटते. मात्र शहराच्या अगदी जवळ असूनही त्यांच्या नशिबी असा नांगर ओढणे आले आहे.