मूलभूत सुविधा नसताना स्मार्ट सिटी कशाला
By Admin | Updated: January 24, 2016 00:10 IST2016-01-24T00:10:10+5:302016-01-24T00:10:10+5:30
धनंजय मुंडे : कृषी महोत्सवात चर्चासत्र

मूलभूत सुविधा नसताना स्मार्ट सिटी कशाला
नाशिक : एकवेळ पंतप्रधानपद टिकविणे सोपे, पण गावचे सरपंचपद टिकविणे सर्वांत अवघड गोष्ट आहे. एकीकडे गावात मूलभूत सुविधा उपलब्ध नसताना दुसरीकडे आधीच आखीव-रेखीव असलेल्या नवी मुंबई-नागपूरसारख्या शहरांना केंद्र सरकार स्मार्ट सिटी करण्यासाठी निघाले आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे यांनी केला.
डोंगरे वसतिगृहावर सुरू असलेल्या जागतिक कृषी महोत्सवात शनिवारी (दि.२३) ‘सरपंच-ग्रामसेवक मांदियाळी’चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार मुंडे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर दिंडोरीप्रणीत स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख अण्णासाहेब मोरे, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष एकनाथ ढाकणे, आमदार जयंत जाधव, जिल्हाध्यक्ष कैलास वाक््चौरे, विभागीय अध्यक्ष बापू अहिरे, सरपंच परिषदेचे अध्यक्ष नवनाथ काकडे, आदर्श सरपंच भास्करराव पेरे-पाटील, केदा बापू काकुस्ते, तुकाराम सांगळे, शंकरराव खेमकर, यतिन कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, छबू नागरे, अर्जुन टिळे आदि उपस्थित होते. आमदार धनंजय मुंडे पुढे म्हणाले, गावकीचे राजकारण आणि निवडणुका या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांपेक्षा वेगळ्या निवडणुका असतात.
राज्यात किंवा केंद्रात एखादा निर्णय घेतला तर त्याचे परिणाम एखाद-दोन वर्षात दिसतात. मात्र सरपंचाने एखादा निर्णय घेतला तर त्याचे पडसाद दुसऱ्या दिवशी लगेचच उमटतात. आज ग्रामपंचायतीला सार्वभौम दर्जा मिळाला असून, गावचा विकास करण्याचा निर्णय गावकरी घेऊ शकतात. (प्रतिनिधी)