गाई कशासाठी आल्या तहसीलदारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 00:18 IST2021-01-01T20:33:11+5:302021-01-02T00:18:36+5:30
वणी : दिंडोरी तहसील कार्यालयाच्या आवारात शुक्रवारी (दि.१) गाईंचा कळप अचानक घुसल्याने नागरिकांसह प्रशासनाची एकच धांदल उडाली. या गाईंनी तेथे असलेल्या वाहनांना धडक देत, काही काळ दहशत निर्माण केली. गाईंना आवाराच्या बाहेर काढता-काढता प्रशासनाच्या नाकीनऊ आले. दरम्यान, हा गाईंचा कळप नेमके कोणते गाऱ्हाणे मांडण्यासाठी तहसील कार्यालय आवारात घुसला, याचीच रंजक चर्चा शहरात सुरू होती.

गाई कशासाठी आल्या तहसीलदारी!
दिंडोरी येथे तहसील कार्यालय, पोलीस ठाणे, रजिस्ट्रार कार्यालय, सेतू कार्यालय, वनविभाग कार्यालययामुळे हे ठिकाण नेहमी वर्दळीचे असते, तसेच समोरील भागात स्टँम्प वेंडर्स, झेरॉक्स व इतर दुकाने आहेत. राज्य मार्गालगत हा भाग असल्याने वाहनांची मोठी वर्दळ या ठिकाणी असते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी ही नेहमी ठरलेली असते, तसेच पालखेड रोडवरून येणारी अवजड वाहने दिंडोरीकरांची डोकेदुखी वाढविणारी आहेत. अशा वर्दळीच्या ठिकाणी चाळीस-पन्नास गाईंचा कळप तहसील कार्यालयाच्या आवारात घुसला आणि साऱ्यांची पळापळ सुरू झाली. काही गाईंनी तेथे उभे असलेल्या वाहनांना धडका देत ती पाडून टाकली. सुदैवाने कोणाला दुखापत झाली नाही. अखेर या गाईंना कसेबसे आवाराच्या बाहेर काढण्यात आले. दरम्यान, सामुदायिक स्वरूपात या गायी कोणाचे गाऱ्हाणे मांडण्यासाठी आल्या होत्या, याची चर्चा मात्र रंजकपणे रंगलेली ऐकायला मिळाली.