कुठे आहे प्लॅस्टिकबंदी ? :यंत्रणांची उदासीनता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 00:03 IST2019-11-13T23:26:40+5:302019-11-14T00:03:22+5:30
गेल्यावर्षी राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत प्लॅस्टिकवर बंदी केली. मात्र प्लॅस्टिकला न दिलेला पर्याय आणि यंत्रणांची उदासीनता यामुळे प्लॅस्टिकबंदी अपयशी ठरली आहे.

कुठे आहे प्लॅस्टिकबंदी ? :यंत्रणांची उदासीनता
नाशिक : गेल्यावर्षी राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत प्लॅस्टिकवर बंदी केली. मात्र प्लॅस्टिकला न दिलेला पर्याय
आणि यंत्रणांची उदासीनता यामुळे प्लॅस्टिकबंदी अपयशी ठरली आहे. आता बंदीला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरही
शहरात खुलेआम वापर करण्यात येत आहे. त्यामुळे प्लॅस्टिकबंदी धाब्यावर तर आहेच, परंतु केंद्र सरकारच्या ‘सिंगल यूज प्लॅस्टिक’च्या मोहिमेचे भवितव्य टांगणीला लागले आहे.
प्लॅस्टिक हे पर्यावरणाला घातक असले तरीदेखील त्याचा दैनंदिन जीवनात सहज वापर केला जातो आणि काम झाल्यानंतर फेकलेल्या या प्लॅस्टिकमुळे अनेक समस्या निर्माण होतात. पर्यावरणाची हानी होते, जनावरांनीदेखील प्लॅस्टिक खाल्ल्यास त्यांच्या जिवावर बेतते. फेकलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांमुळे नाले-गटारी तुंबतात त्याचादेखील नागरिकांना त्रास होतो. यापूर्वी शासनाने मायक्रॉनवर आधारित निर्बंध घातले होते. मात्र, राज्याचे तत्कालीन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी गतवर्षी प्लॅस्टिकबंदी जाहीर केली होती. हा निर्णय झाल्यानंतर पुढील काही महिन्यांत जोरदार अंमलबजावणी करण्यात आली. यात सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व प्रदूषण महामंडळाने कारवाईचा धडाका लावत अनेक दुकानदारांकडून पाच हजारांपासून ते २५ हजार रुपयांपर्यंत दंड वसूल करण्यात आला. आता तर केंद्र सरकारने ‘सिंगल यूज प्लॅस्टिक’ मोहीम सुरू केली असून, महापालिकेचादेखील त्यात समावेश आहे. मात्र, सरकारी कार्यालयातील स्थिती ‘जैसे थे’ आहे. तसेच किरकोळविक्रेते, दुकानदार सर्रासपणे प्लॅस्टिकच्या पिशव्या ग्राहकांना देत असल्याचे दिसत आहे, तर नागरिकही कुठलीही तमा न बाळगता ‘सिंगल यूज प्लॅस्टिक’च्या पिशव्यांचा वापर करत आहे. त्यामुळे अशा स्थितीत २०२२ पर्यंत भारतातून ‘सिंगल यूज प्लॅस्टिक’ला हटविण्याच्या प्रतिज्ञेचे काय होईल? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
माणसांनाच नव्हे, प्राण्यांनाही घातक
डिस्पोजसाठी टाकण्यात आलेला एक लहानसा तुकडाही पृथ्वीसाठी नुकसानकारी आहे. नाल्या, लहान नाले या माध्यमातून हा कचरा नद्यांमध्ये जातो. यामुळे नदीच्या प्रदूषणात मोठी भर पडत असते. त्यामुळे नदीतील जलचरांवर त्याचा विपरीत परिणाम होतो. प्लॅस्टिकमधील धोकादायक रसायने पाण्यात मिसळल्याने तसेच जलचरांच्या पोटात गेल्याने त्यांचा मृत्यूही होऊ शकतो. एवढेच नाही तर प्लॅस्टिकमुळे जमिनीतील प्लॅस्टिक -मुळे खनिज, पाणी व पोषक तत्त्वांना बाधा पोहचते. भूजलातील प्रदूषणाचे हेसुद्धा एक मोठे कारण आहे. तसेच प्लॅस्टिकमधील बेंजीन हा पदार्थ पेयजलाची गुणवत्ता नष्ट करते.
प्रशासनाचे मौन
‘सिंगल यूज प्लॅस्टिक’च्या विरोधात मोहीम राबविण्यासंदर्भात मनपा व प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र यंत्रणा गंभीर असल्याचे दिसत नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाने तर मनुष्यबळ नसल्याचे सांगून हात झटकले आहेत. महापालिकेचे कर्मचारी कारवाई करतात खरी, परंतु त्यांच्याकडे स्वच्छतेच्या पलीकडे अनेक जबाबदाऱ्या असल्याने त्यांच्यावर मर्यादा येतात किंवा मध्यंतरी तर सिडकोत दंडात्मक कारवाईची भीती दाखवून कर्मचाऱ्यांनीच हात ओले केल्याचे प्रकार घडले होते.
बंदीची गरज का ?
जल, वायू परिवर्तन आणि ग्लोबल वार्मिंगमुळे होत असलेला पर्यावरणाचा ºहास जगाच्या दृष्टीने मोठा चिंतेचा विषय आहे. असे असले तरी प्लॅस्टिकचा वापर एवढा बेसुमार वाढला आहे की, या प्लॅस्टिकमुळे निर्माण होणारे प्रदूषण थांबविणे आणि वाया जाणाºया प्लॅस्टिकचे व्यवस्थापन करणे ही जगाच्या दृष्टीनेच मोठी समस्या ठरली आहे. दरवर्षी कितीतरी लाख टन प्लॅस्टिकची निर्मिती होते. मात्र त्याचे विघटन होत नाही. त्यामुळे ‘सिंगल-यूज प्लॅस्टिकचा वापर थांबविण्यासाठी जगभरातील देश कडक धोरणांची अंमलबजावणी करत आहेत.
प्लॅस्टिकच आहे
कॅन्सरला कारण
डिस्पोजेबल उत्पादने आणि पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणाºया प्लॅस्टिकचा उपयोग प्रचंड वाढला आहे. परिणामत: प्लॅस्टिकच्या कचºयाचे ढीगही वाढत आहेत. रसायनामुळे माणसाच्या शरीरात कॅन्सर (कर्करोग) निर्माण होतो. प्लॅस्टिकमधील घातक रसायनांमुळे लठ्ठपणा आणि मधुमेह यांसारखे आजार जडतात. तसेच प्लॅस्टिक जाळल्यावर कार्बन मोनोआॅक्साइड, डायआॅक्सिन, हायड्रोजन सायनाइड यासारखे विषारी वायू वातावरणात पसरतात. त्याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होेतो. प्लॅस्टिक वजनाला हलके असल्याने कचराकुंडीतून हवेसोबत उडून दुसरीकडे पसरतात. यातून जीवजंतूचा प्रादुर्भाव पसरतो.
प्लॅस्टिकपासून इंधन निर्मिती
प्लॅस्टिकबंदीनंतर महापालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातच प्लॅस्टिक नष्ट करण्याचा एक प्रकल्प राबविला जात आहे. साडेतीन टन प्लॅस्टिकवर त्या माध्यमातून प्रक्रिया केली जात आहे. या प्लॅस्टिकपासून फर्नेश आॅइल तयार केले जाते. ते याच ठिकाणी मृत जनावरे जाळण्याच्या भट्टीत इंधन म्हणून वापरले जाते. दैनंदिन केरकचरा संकलनातून आलेले प्लॅस्टिक आणि त्यानंतर बाजारातून जप्त केलेले प्लॅस्टिक त्यात वापरले जाते. अर्थात, बंदी असतानादेखील इतके प्लॅस्टिक येते कुठून? असादेखील प्रश्न आहे.