१८०० दिवसांत झाले नाही ते २५ दिवसांत होईल काय? 

By श्याम बागुल | Published: August 21, 2019 03:01 PM2019-08-21T15:01:17+5:302019-08-21T15:05:15+5:30

सलग दहा वर्षे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करूनही मतदारसंघाचे प्रश्न सोडविण्यास त्या पूर्णत: अपयशी ठरल्या, याची त्यांनी एकप्रकारे दिलेली कबुलीच आहे.

What has not happened in 7 days? | १८०० दिवसांत झाले नाही ते २५ दिवसांत होईल काय? 

१८०० दिवसांत झाले नाही ते २५ दिवसांत होईल काय? 

Next
ठळक मुद्देनगरसेवक ते विधिमंडळाची सलग दुसऱ्यांदा गावित पायरी चढल्या स्वत:बरोबरच पुत्र व कन्येचादेखील कॉँग्रेसच्या माध्यमातून राजकीय उद्धार

श्याम बागुल
नाशिक : कॉँग्रेस खासदाराची कन्या हीच ओळख घेऊन सासरी नाशिकला आलेल्या निर्मला गावित यांच्या राजकीय कारकिर्दीचे सिंहावलोकन करायचे झाल्यास नाशिक महापालिकेत अपक्ष म्हणून राजकीय नशीब आजमावताना आलेल्या अपयशातून त्यांनी कॉँग्रेसचे बोट धरून महापालिकेची चढलेली पायरी व त्यातून सलग दहा वर्षे विधिमंडळात निवडून जाताना गाठलेली यशाची कमान बरेच काही सांगून जाते. स्वत:बरोबरच पुत्र व कन्येचादेखील कॉँग्रेसच्या माध्यमातून राजकीय उद्धार करणाऱ्या गावित यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सेनेचे शिवबंधन बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मतदारसंघातील अनेक कामे करण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे कारण गावित यांनी पक्षांतरामागे दिले आहे. विधिमंडळाच्या सदस्यत्वाची शपथ घेऊन १८०० दिवसांत जे होऊ शकले नाही, ते आगामी २५ दिवसांत होईल, असा भोळा आशावाद गावित यांनी कशाच्या आधारे बांधला याचा उलगडा होऊ शकत नसला तरी, सलग दहा वर्षे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करूनही मतदारसंघाचे प्रश्न सोडविण्यास त्या पूर्णत: अपयशी ठरल्या, याची त्यांनी एकप्रकारे दिलेली कबुलीच आहे.


इगतपुरी मतदारसंघाच्या कॉँग्रेसच्या आमदार निर्मला गावित यांनी अखेर शिवबंधन हाती बांधले. बदलत्या राजकीय समीकरणांचा तो भाग असला तरी, गावित यांना राज्याची विधानसभा निवडणूक अवघ्या महिन्यावर येऊन ठेपलेली असताना मतदारसंघाच्या विकासकामांचा पुळका यावा व कामे करण्यासाठीच शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याची त्यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया बरेच काही सांगून जाते. नगरसेवक ते विधिमंडळाची सलग दुसऱ्यांदा पायरी चढलेल्या गावित यांना तब्बल दहा वर्षे मतदारसंघातील कामे करण्याची संधी मतदारांनी दिली. त्यातील पाच वर्षे तर राज्यात कॉँग्रेस आघाडीची सत्ता असल्यामुळे गावित यांनी या सत्तेचा कितपत फायदा उचलला हे मतदारसंघातील मतदार चांगलेच जाणून आहेत. त्यामुळे उर्वरित पाच वर्षे जरी विरोधकांची सत्ता होती आणि या सत्तेच्या काळात मतदारसंघातील कामे होत नव्हती, असे गावित यांचे म्हणणे घटकाभर मान्य केले तरी, मतदारसंघातील कामांची खरोखरच कळकळ होती तर गावित यांनी पक्षांतर करण्यासाठी कालापव्यव करून एकप्रकारे मतदारांची प्रतारणाच केली असेच म्हणावे लागेल. त्यांच्या चालू कारकिर्दीचे अखेरचे काही दिवस शिल्लक आहेत, या शिल्लक दिवसात मतदारसंघातील असे कोणते प्रश्न ऐरणीवर आहेत की सत्तेतील शिवसेना जादूची कांडी फिरविल्यागत ते सोडविणार आहे? त्यामुळे मतदार व मतदारसंघाचे नाव पुढे करून पक्षांतर करणाºया गावित यांचे शिवसेनेच्या वळचणीला जाण्यामागे निव्वळ आगामी विधानसभा निवडणुकीतील पराभवाची भीतीच कारणीभूत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत गावित यांच्या इगतपुरी-त्र्यंबक मतदारसंघातून सेनेच्या खासदारांना मिळालेल्या मतांची आघाडी पाहून गावित यांची झोप उडाली होती. आता निश्ंिचत झोप लागावी म्हणून गावित यांनी शिवबंधन बांधले असले तरी, गेल्या दहा वर्षांपासून गावित यांच्याशी दोन हात करणा-या निष्ठावंत शिवसैनिकांच्या पचनी गावित यांचे पक्षांतर कितपत पडेल, याविषयी साशंकता आहे.

Web Title: What has not happened in 7 days?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.