लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नवीन प्रभाग रचनेनंतर जुन्या नाशकातील प्रभाग क्रमांक १३ नाशिक पूर्व विभागातून काढून घेत तो पश्चिम विभागाला जोडल्याने दोन्ही विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशासकीय कामकाज करताना मात्र मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. त्यातच, अतिक्रमणविरोधी संबंधी कारवाईचे अधिकार पश्चिम विभागाला तर वसुलीचे अधिकार पूर्व विभागाला बहाल करण्यात आल्याने ‘मार खायला पश्चिम विभाग अन् मलिदा खायला पूर्व विभाग’ अशी विनोदी चर्चा ऐकायला मिळत आहे. महापालिका निवडणुकीसाठी यंदा चार सदस्यांचा प्रभाग करण्यात आला, शिवाय प्रभाग रचनाही नव्याने करण्यात आली. सद्यस्थितीत, नाशिक पूर्व विभागात १४,१५,१६,२३,३० आणि ३१ हे सहा प्रभाग असून, पश्चिम विभागाला ७, १२ आणि १३ हे प्रभाग जोडण्यात आले आहेत. प्रभाग १३ हा यापूर्वी पूर्व विभागाला जोडण्यात आला होता. परंतु, नवीन प्रभाग रचनेनंतर तो पश्चिम विभागाला जोडण्यात आल्याने प्रभागाचे नगरसेवक वत्सला खैरे, गजानन शेलार, सुरेखा भोसले व शाहू खैरे यांनी त्यात कडाडून विरोध दर्शविला होता. प्रभाग १३ पश्चिमला जोडल्याने प्रशासकीय कामकाज करताना अडचणी येणार असल्याची तक्रार त्याचवेळी या नगरसेवकांनी केली होती. परंतु, त्याची दखल घेण्यात आली नाही. आता प्रत्यक्षात कामकाज सुरू झाल्यानंतर प्रभाग १३ मधील रहिवाशांना महापालिकेशी संबंधित कामकाज करताना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. तीच स्थिती प्रशासनानील अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही बनली आहे. पश्चिम विभागाकडे प्रभाग १३ मधील अनधिकृत बांधकामांसंबंधी कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत; मात्र घरपट्टी-पाणीपट्टीसह तत्सम करवसुलीचे अधिकार पूर्व विभागाला बहाल करण्यात आले आहेत.
मार खायला पश्चिम विभाग; मलिदा खाणार पूर्व विभाग
By admin | Updated: June 10, 2017 01:50 IST