पंचवटी : गेल्या दोन दिवसांपासून उष्णतेचा पारा वाढल्याने नागरिकांना दुपारच्या वेळी प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. उकाड्यापाठोपाठ उन्हाचा तडाखा सहन करावा लागत असल्याने त्याचा परिणाम दैनंदिन कामकाजावर होत आहे. बुधवारच्या दिवशी सकाळपासूनच कडाक्याचे ऊन असल्याने त्याचा परिणाम गंगाघाटावर भरणाऱ्या आठवडे बाजारावर दिसून आला. दुपारी बारा वाजेनंतर उन्हाचा पारा चढल्याने आठवडे बाजार असूनही गंगाघाटावर शुकशुकाट पसरलेला होता. आठवडे बाजार म्हटला की, विविध वस्तूंचे विक्रेते व भाजीपाला तसेच किराणा माल खरेदीसाठी शहर तसेच आजूबाजूच्या खेड्यापाड्यातून येणारे ग्राहक असेच चित्र दिसते. मात्र बुधवारच्या दिवशी परिस्थिती अत्यंत उलट होती. उन्हाचा तडाखा बसत असल्याने ग्राहकांनी दुपारनंतर भाजीबाजाराकडे पाठ फिरविली. इतर वेळी शेकडो ग्राहकांच्या वर्दळीने फुलणारा भाजीबाजार बुधवारचा दिवस असतानाही ओस पडलेला होता. सायंकाळी पाच वाजेनंतर उन्हाच्या झळा काहीशा कमी झाल्यानंतर ग्राहकांनी बाजारात जाण्यास सुरुवात केल्याचे चित्र दिसून आले. उन्हामुळे बुधवारचा बाजार ओस पडल्याने हजारो रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचे विविध वस्तू विक्रेत्यांनी सांगितले. (वार्ताहर)
बुधवारचा आठवडे बाजार पडला ओस
By admin | Updated: March 29, 2017 23:51 IST