मालेगाव तालुक्यातील ११ गावे व ४९ वाड्यांना टॅँकरने पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 18:44 IST2018-10-17T18:44:36+5:302018-10-17T18:44:49+5:30
मालेगाव : तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणी व चारा टंचाईच्या झळा ग्रामीण भागाला बसू लागल्या आहेत. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे.

मालेगाव तालुक्यातील ११ गावे व ४९ वाड्यांना टॅँकरने पाणीपुरवठा
मालेगाव : तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणी व चारा टंचाईच्या झळा ग्रामीण भागाला बसू लागल्या आहेत. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे. तालुक्यातील ११ गावे व ४९ वाड्यांची तहान टॅँकरच्या सहाय्याने भागविली जात आहे. तालुक्यातील लघु प्रकल्पांमध्ये उपलब्ध जलसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे. धरणांमधील पाणी चोरण्यांवर कायद्याचा बडगा उगारला जात आहे.
तालुक्यात पाणी टंचाईने रौद्ररुप धारण केले आहे. पावसाळ्यात केवळ १७५ मीमी पाऊस झाला आहे. जलस्त्रोत कोरडेठाक पडले आहे. अत्यल्प पावसामुळे खरीप हंगाम वाया गेला आहे. दिवसागणिक वाढत्या उन्हामुळे शेती शिवारातील विहिरींनी तळ गाठला आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांसह ग्रामपंचायतीच्या स्थानिक पाणीपुरवठा योजना कोलमडून पडल्या आहेत. तालुक्यातील मेहुणे, दुंधे, टाकळी, सावकारवाडी, वºहाणे, झाडी, निंबायती, चौकटपाडे, निमगाव, चोंढी, नगाव दिगर आदि गावांना दररोज टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच विविध गावांच्या ४९ वाड्यांना टॅँकर सुरू करण्यात आले आहे. दररोज ३२ खेपांद्वारे ११ गावे व ४९ वाड्यांना टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्यातील तळवाडे व संगमेश्वर भागातील दोन विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. एका बोअरवेलचा ताबा घेण्यात आला आहे. येथून टंचाईग्रस्त ११ गावे व ४९ वाड्यांना टॅँकर भरुन पाणीपुरविले जात आहे. पाणीपुरवठा करण्यासाठी एक शासकीय व दहा खाजगी टॅँकर लावण्यात आले आहेत. गरजेनुसार टॅँकरच्या संख्येत वाढ केली जाणार आहे. भविष्यात तीव्र पाणीटंचाई तालुक्याला जाणावणार असून टॅँकरच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.